Sunday, January 31, 2010

मला परतायचय माझ्या लोकांसाठी, माझ्या कवितांसाठी... माझ्या साठी..

खूप दिवस झालेत ब्लॉग वर पोस्ट टाकता आली नाही.. माझा मित्र हेरंब ओक त्यादिवशी chat करताना म्हणाला "काय रे?? तुझा ब्लॉग का झोपलाय??". त्याला
सांगितलं "मित्रा, काय करू? ह्या प्रोजेक्ट मुळे वेळच मिळत नाही". खर
तर मला म्हणायचं होत कि "मित्रा, इथे नशीबच झोपलंय.. ब्लॉग च काय घेऊन बसलायस.."
इतकं काही साठलंय या डोक्यात, पण लिहायला बिलकुल वेळ नाही.
गेल्या काही महिन्यात फार विचित्र परिस्थिती झालीये..
प्रोजेक्ट ची Deadline इतकी टाईट आहे कि बस (By the Way, या अख्या जगात अस कुठल प्रोजेक्ट आहे ज्याची deadline टाईट नसते? [हसू नका, सरकारी प्रोजेक्ट्स बद्दल बोलत नाहीये मी])
मी गमतीनी कितीतरी वेळा म्हणतो कि नशीब अजून बायकोने सोडचिठ्ठी दिली नाही.
पण खरच विचार केला तर मी काय करतोय माझ्या कुटुंबासाठी?
किती दिवसा आधी बायको-पोरी सोबत रात्री च जेवण केलं होत ? किती दिवस झालेत बायकोला विचारून कि तुझ्या oriflam च्या business च काय सुरु आहे? किंवा तिला हे सांगून कि "मन्या, मस्त झालाय ग मसाले भात".. खरच नशीब, अजून बायकोने devorse दिला नाही.. नशीब
चांगलं आणि बायको हि.. म्हणून तग धरून आहे अजून..
सकाळी ७ वाजता पोरी ला उठवून तयार करून (हो, पोरीला रोज मीच तयार करतो. तेवढच एक तीच बालपण अनुभवतोय मी.. बस) शाळेत अक्षरश: पिटाळून लावत जी race सुरु होते ती दिवस भर धावत रात्री १२-१ ला संपते..
तिला तयार करताना तिचा लाड करायला पण सवड मिळत नाही.. तिकडे स्कूल-बस सोसायटीच्या गेट वर येऊन उभी राहील या धास्तीने तिच्या वर ओरडणे.. एवढाच काय तो संवाद आम्हा दोघा मध्ये.. कसले संस्कार देतोय पोरीला मी??
रात्री मी येत पर्यंत ती बिचारी माझी वाट बघत झोपून गेली असते.. तिला प्रोमीस केलेलं तिच्या बार्बी साठी पुठ्याच घर बनवायचं राहूनच गेलंय.. तीं २-३ वेळा म्हणाली मला .. मी फक्त "पुढच्या संडे ला पक्कं.. Promise"..इतकं बोलून टाळलंय...
एव्हाना ती विसरून पण गेली असेल.. बार्बी च घर ..

माझा अक्षरश: "दमलेला बाबा" झालाय.. नव्हे.. माझ्या वरूनच ते गाणं सुचलंय सलील संदीप ला..

ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये


काय करतोय मी नक्की?? का धावत सुटलोय घडीच्या काटयावर?? बर, म्हणावं कि पैस्या मागे धावतोय तर ते हि नाही.. बँक-बँलस म्हणजे सहकारी बँकेच्या संचालकांनीच लुटलेल्या खात्या सारखे ... मग नक्की काय?? का हि अवस्था?
कुणी दुसर्या ने कुण्या तिसर्याला केलेल्या commitments पूर्ण करायला आम्ही का धावायचं??
"तुम्ही गाढवा सारख राबाच, आणि सोबत तुमच्या टीम ला पण राबवा.." का? तर म्हणे एका लीडर च हेच काम असत.. आरे लीडर लीड करायला असतो कि दुसर्यांना राबवायला? सगळी कडे असाच असत का?? सालं मला वाटत, मी कधीच एक चांगला Manager बनू शकत नाही, कारण त्या साठी एक बेसिक क्वालिटी असावी लागते .. "कमीने पणाची"... हिंदीत "कमिनियत" ,जी माझ्यात कधीच येऊ शकत नाही..
इथे चांगला म्हणजे "जो सगळ्या तें कडून गाढवा सारख राबवून काम करून घेऊ शकेल " असा अर्थ अभिप्रेत आहे..
चांगल्या Manager ची आणखी दुसरी कुठली व्याख्या आहे काहो जगात??
सॉरी ग मन्या.. तुझा असलेला सगळा वेळ मी कामाला देतोय..
आणि आर्या सोन्या .. आपण नक्की बनवूया तुझ्या बार्बी साठी घर ...
मला परतायचय ग तुमच्या साठी.. आणि हो, माझ्या कवितांसाठी पण..
मला परतायचय माझ्या साठी...
नंदिनी उपासनी (माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आणि माझ्या कविताची समीक्षक) मला म्हणाली होती: "किती
छान लिहितोस.. हे सुंदर हृदय असच जपून ठेव आणि असाच लिहित राहा.."
स्वीटहार्ट, अजून मोडलेलो नाहीये मी.. मी परत येणार.. मी परत येणार आयुष्यात.. आयुष्य पुनः जगायला॥
एक शेर: (माझा नाहीये)
सिफत हिरे कि हो तो अंधेरे मी मिलो..
उजाले मी तो कांच भी चमक जाते है