Sunday, April 17, 2016

ऑप्शन...





ती तिचा उंबरठा आणि तो त्याचं विश्व ओलांडून एकमेकांना भेटायला आलेले.. आणि आता वाडेश्वर कडून डेक्कन डेपो मागे नदीपात्राकडे चालतं जात होते.. एरव्ही जरा दुरून चालणारी ती, रस्ता ओलांडताना मात्र त्याचा हात अलगद धरत होती. रस्ता ओलांडून झाला कि परत तितकीच दूर... त्या अर्ध्या तासात त्या दोघांनी मोजून पाच वेळा रस्ते ओलांडले...
त्यांचं नातं काय हे तसं त्यांना हि सांगता येणार नाही.. बहुतेक दोघं पण त्या नात्या कडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असावेत. त्याच्या साठी ती, म्हणजे मैत्री पलीकडली.. बऱ्याच पलीकडली.. प्रेम? असेल हि कदाचित. त्याने बऱ्याचदा गमतीने हे बोलून हि दाखवले.. पण दोघांनीही व्यवहारिकरित्या, सोयीस्करपणे फारसं सिरीयसली घेतलं नाही. कारण तिला तिचा उंबरठा होता अडवायला आणि ह्याला ह्याच विश्व...
तिच्या साठी तो कोण होता कुणास ठाऊक.. अगदी त्यालाही न्हवतं कळत. पण बोलायला कुणी नसलं किंवा जे सांगायचंय ते कुणालाच सांगण्या सारखं नसलं की ती ह्याला सांगायची. हा म्हणायचा, मी तुझ्या साठी प्रयोरिटी कधीच कसा नसतो, नेहेमी एका ऑप्शन सारखा का असतो मी? ती म्हणायची, नाही रे.. माझा व्याप खूप आहे. सगळ्यांची मर्जी सांभाळता सांभाळता स्वतः साठी वेळचं मिळत नाही.. मग कधीतरी, म्हणजे आठवड्याभऱ्याने किंवा कधी पंधरा दिवसाने बोलणं होतं... (आणि पुढच्या बोलण्यापर्यंत तो वाट बघत रहायचा...)
पण आज त्याला अगदी स्पेशल असल्या सारखं वाटतं होतं. आज तो तिच्या साठी ऑप्शन न्हवता.. अगदी खास त्याच्या साठी तिने वेळ काढला होता..
रस्ता ओलांडताना तिने हात किती वेळा पकडला हे पण त्याने मोजले होते. तेवढ्यानेच तो सुखावून गेला होता... 
"थँक्स हा, छान वाटलं, तू रस्ता ओलांडताना माझा हात धरलास तेव्हा. गेल्या अर्ध्या तासात तू चक्क पाच वेळा हात धरलास माझा..  अगदी स्पेशल असल्या सारखं वाटलं मला..."
ती: "अरे तसं काही नाही. मला रास्ता ओलांडताना भीती वाटते, सो कुणीही सोबत असलं तरी मी हात पकडते. चल, मी निघते आता. ताईंचं काम झालं असेल. त्या वाट बघत असतील..."