Saturday, January 21, 2017

सांझ, रात, मी आणि आठवणी...

सांझ अशी हळवी कातर होत राहते...
तुझ्या आठवणी पायात गुंतवून घेत राहते..
पायात बांधलेल्या पैंजणांसारख्या आठवणी...
बसून राहते सांझ.. तिची जायची वेळ होते तरीही ती रेंगाळत राहते...
रात्र तिकडे घाई करतेय यायची.. पण ही सांझ काही जात नाही... ती माझ्याच सारखी गुंतून पडते, आठवणीत... मग मीच तिला जायला सांगतो..
उठून दिवा मालवतो आणि रात्र करून घेतो स्वतः भोवती..
आता रात्र येते... आणि येतात तिच्या सोबत त्या काही रात्रींच्या आठवणी...
पिठूळ चांदण्यातल्या पायवाटीवरल्या आणि झोपाळ्यावरल्या ताऱ्यांतले स्पर्श ही काही...
अवसेच्या राती काही अन घट्ट बिलगलेली मिठी..
काही रुसवे.. काही भांडण..
काही गोडवे गायलेले,
काही तुटले तुटले कंगन..
मग कधी तरी ती पण येते,
वादळाची रात्र..
मी अजून जगतोय तो पाऊस,
तू अजूनही कोरडी मात्र...

#मोहा

Monday, January 2, 2017

रात जरा मधे, पाझरू दे...

सोड ना जरा, सैल मिठी अता
रात जरा मधे, पाझरू दे...

तू, मी अन हि रात शबनमी,
देह पिसारा पिसारा, पांघरू दे...

श्वास माझा, माझाचं गंध,
रोमांतुनी तुझ्या, जरा झरु दे...

हळवे गोंदण, ओठांत पेरलेले,
अलवार अनादी चुंबन,तेव्हडे स्मरु दे....
#मोहा