Tuesday, December 25, 2018

मला सुचलेली तू गझल हो

सोडलेस ते केस जरासे
अन ही मोहसांझ पसरली..
पश्चिमज्वाळा विझून गेल्या
पदरकिनार जरा थरथरली..

गजरा सैल जरासा झाला,
अन बट ती जरा लहरली...
सांडल्या अबोल कळ्या अन
घनकाळी ही रात गहरली...

मी स्मरता कविता माझ्या
का तुजला विराणी स्मरली?
मला सुचलेली तू गझल हो,
अलवार मग ही ओळ उतरली...

#मोहा

Wednesday, August 1, 2018

कॉफी चा कप आणि तो कोपरा..

पाऊस आला की मला फार विचित्र वाटतं.. काही तरी हरवल्या सारखं.. 
खूप हुरहूर जाणवते..
खरं तर सगळं काही ठीकच आहे... पण काही तरी होतं.. मग हे असं काही तरी सुचतं:


हा पाऊस बघितला ना खिडकीतून, तर कधी कधी वाटतं, मी तसंच रहावं...
खिडकीत राहून गेलेल्या कॉफी च्या कपा सारखं.. एका कोपऱ्यात.. निवांत.. तुझ्या असण्याचा सुगंध आणि तू गेल्यावर, काठावर उरलेला, सुकत चाललेला तवंग सांभाळत... एका कोपऱ्यात... निवांत...

त्या खिडकीतून पलीकडे दिसणारा चाफा हल्ली फुलत नाही बरं का आधी सारखा... भकास वाटतेय ती स्पेस आता... पण तरी.. मला आवडतो तो निवांत कोपरा...

इथून ना, ती बुकशेल्फ पण दिसतेय, आपण घेतलेली, आपण सजवलेली.. तुझ्या कवितांनी आणि माझ्या गझलांनी सजलेली... तशी तिथं मी जळमटं लागू दिली नाहीत कधी... पण हल्ली धुळीची पुटं वाढत चाललीये... आपल्यात वाढत जाणाऱ्या दुराव्या सारखी...

#मोहा

Wednesday, July 18, 2018

अनोळखी, पाहणे खूप झाले

ओळखीचे हसू ते, येऊ दे आता तरी,
नुसतेच अनोळखी, पाहणे खूप झाले....

तू व्यापले विश्व माझे, मी उरलो कुठे?
नसण्याचे कुठेही तरी, बहाणे खूप झाले.....

शहाणे अंतर असे ते, आहे तसेच राहो,
बावरल्या जवळीकेचे पण, तराणे खूप झाले....

#मोहा

Monday, July 2, 2018

शिंपून झाली अत्तरे...

आठवांची कुपी ही,
कोण सांडून गेले जातांना,
पावसापरी मग सारी,
शिंपून झाली अत्तरे...

प्रश्नांच्या राशी ह्या, 
कोण मांडून गेले जातांना,
माझ्या तुझ्या मौनातून, 
मग उलगडली ती उत्तरे..

विद्ध सूर अन ताण अशी तू,
छेडून गेली गातांना,
मी ही गात फिरतो आता,
यमक नसलेले अंतरे...

#मोहा

Monday, June 18, 2018

सुडोकू

जेव्हा पण मी सुडोकू सोडवायला घेतो, तुझी आठवण येते...
आठवतं, तूच शिकवलेले मला हे सोडवायला...?


Sunday, March 11, 2018

मी फक्त स्वप्नात रे, तुजला भेटलेलो,
वास्तवाशी माझा,कसला संबंध नाही...

भेटायचेच तुजला, कधीतरी नशिबा,
पण भेटण्याचा तुजला, कसला प्रबंध नाही...

ना पळतो उरी घेऊनी साऱ्या अपेक्षा,
कोण जिवन्त असा अन, कोण कबंध नाही?

जुळता जुळता सारे,विखरून सांडलेले,
विषाचे प्याले ही अन, येथे सबंध नाही..

#मोहा


*कबंध: शीर नसलेलं प्रेत

हिशोब तुझा न माझा...

टीप: ही गझल नाही. फॉर्म जरी गझले सारखा असला, तरीही ही कविताच आहे. कारण सुरेश भट "गझलेची बाराखडी" मधे म्हणतात: "गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो."

असो, तर, आज ही कविता:

तू ये ना कधी तुझ्या, साऱ्या राती घेऊनी,
मांडू हिशोब सारे, हात हाती घेऊनी...

तू मोजलेल्या तारका, मी सोसलेली वादळे,
आणि स्वप्ने रुजवलेली, ओली माती घेऊनी...

त्या पेटलेल्या मशाली, ठेवूनिया उशाशी,
उजेडाची स्वप्ने बघू, विझल्या वाती घेऊनी...

आज मांडायचेच सारे, माझे तुझे रकाने,
हिशोबी भावनांची, सारी खाती घेऊनी...

वा करूयात का ऐसे? मोडून हिशोब सारा,
भटकून येऊ युगांती, साथ साथी घेऊनी..


#मोहा

Friday, March 2, 2018

रंग मला दे कान्हा...

Image credit: http://bit.ly/2FLioY3


उधळून टाक सारे, रंग तुझे ते कान्हा,
श्याम तेव्हढा तो, रंग मला दे कान्हा...

मोरपिसापरी बघ त्या, रंगल्यात साऱ्या गोपिका,
मजला परी तुझ्यासम, कर सावळी रे कान्हा..

हरपले मी, हरवले मी, खोल अश्या त्या डोही,
रंग ज्याचा, श्यामसावळा, तुझ्यासारखा रे कान्हा...

सावळा तू, सावळी मी, सावळी ही बासरी,
भान सारे, तान सारी, निळीसावळी रे कान्हा..

#मोहा

Thursday, February 15, 2018

ह्या कशाला चांदण्या रे...

ह्या कशाला चांदण्या रे,
केसांत माझ्या माळल्या??
अन रातवेड्या रातराण्या,
बघ माझ्यावर भाळल्या...

बघ मीही कितीक राती,
धुंदीत जागून जाळल्या..
वाटा तुझ्याच आणि मग
तिन्ही सांझा न्याहाळल्या..

#मोहा

Wednesday, February 7, 2018

घे आज सारे..

घे आज सारे, तुजला गुलाब माझे,
काट्यांसवे तुझ्या, मजला जगू दे जरा....

तू जा तुझ्या प्रवासा, घेऊन काफ़िला तो,
माझी वाट आता, अशीच सरु दे जरा...

कितीक शेर केले, लिहिल्या कितीक गजला,
हा एवढाच एक हा, काफिया स्मरू दे जरा...

तू नखशिखांत सजवून, सारे साज घे ना,
माझ्या शेवटाचे, पण मला आवरू दे जरा..

#मोहा

Sunday, January 28, 2018

अमावस्या आणि सरपटणारं काहीतरी

साधरण ४-५ वर्षाआधी ची गोष्ट.. रात्र तशी अम्वाश्येची.. पण दिवाळीची.. सगळी कडे झगमगाट, दिवे, लायटिंग.. सगळी कडे आनंद, उत्साह.. आम्ही पूजा आटपून बाहेर फटाके, आतिषबाजी सगळ आटपून जेवायला घरात येवून पण साधारण दोन तास होवून गेले होते. आईने केलेल्या नागपुरी पुरणपोळी, वडाभात, मसाल्याची वांगी इत्यादी जेवणावर ताव अंनि गप्पा मारत, तास भर जेवण चालू होते. साधारण १२-१२.३० पर्यंत यथासांग जेवणं आणि त्यानंतर आईने लावलेले पान चघळत वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि गंमत म्हणजे “फारशी भूक नाहीये मला” असं म्हणून पण गेला तास भर हादडत बसलो होतो.. आता ते सगळ जेवण गळ्याशी येत होतं म्हणून जरा शतपावली करावी म्हणून मी बाहेर पडलो. आमच्या नागपूर च्या घरासमोर मोठ्ठ मैदान आहे.. नागपूरला असलो, की रोज रात्री तिथे जरावेळ शत्पावली करायची सवय आहे.. तसच त्याही रात्री रस्ता ओलांडून मैदानात आलो आणि चालू लागलो.. आता सारखे तेव्हा तिथे हायमास्ट चे लाईट लागले न्हवते.. मी जरा माझ्या विचारांच्या तंद्र्तीच होतो.. थोड्याच वेळात जरासा गारठा जाणवताच माझ्या लक्षात आलं कि, आजुबाजू च्या घरातली रोषणाई आता कमी झालीये, दिवे कधीचेच विझून गेले होते.. नाही म्हणायला बऱ्यांच घरातले आकाश कंदील वार्यावर डुलत होते.. पण मैदानात मात्र एकंदरीत जरा अंधारच होता.. तो अंधार तसा सवयीचा असूनही मला जरा अचानकच एकटेपणाची आणि त्या अंधाराची जाणीव झाली.. बहुतेक मघाशी घरात जातानाचा उजेड आता नाहीसा झाल्याची ती जाणीव होती असं मनात येऊन गेलं. मी तसाच ह्या कोपर्यापासून त्या कोपर्यापर्यंत चालत गेलो. तिकडे असणार्या देवळातल्या गणपतीला आणि पिंडीला नमस्कार करून परत फिरलो आणि चालू लागलो..

थोडा वेळ चालल्यावर मला असं वाटलं कि माझ्या मागे कुणी तरी चालतंय.. म्हणजे अगदी अस्पष्ट असा आवाज आला.. मला वाटलं कुठलं कुत्रंबित्र असाव.. मी मागं वळून बघितल.. कुणीच न्हवतं.. “भास असावा बहुतेक?” मी माझच मला म्हणालो. मी सहसा लवकर घाबरत नाही. अगदी कुठल्याही वेळी कुठेही जातो. स्वभावत: जरा न घाबरणारा असल्यामूळे काहीही वाटलं नाही.. परत चालू लागलो.. दोन-चारच पावलं चाललो असेल.. परत तसाच आवाज.. आणि ह्यावेळेस जरा जास्त स्पष्ट.. मी थांबलो.. तर आवाज पण थांबला.. बरं, तो आवाज चालण्याचा,पावलांचा असावा म्हणाल तर तसाही न्हवता.. एखादा लुळापांगळा देह, पायात जीव नसलेला, हातांच्या जोरावर वाळलेल्या गवतावर जसा सरपटत जातो, तसला आवाज... स्रर्र्र्रर्र्र्र.... स्रर्र्र्रर्र्र्र.. स्रर्र्र्रर्र्र्र..  तिथलं गवत बर्या पैकी वाळलेलं होतं.. मी परत मागे फिरून बघितलं.. कुणीच नाही.. आणि आता अंधार जरा जास्तच गडद वाटत होता.. देवळातला दिवा तेव्हढा सुरु होता.. मी मागे बघतच उलटा होवून चालायला लागलो... परत तेच.. परत तोच सरपटण्याचा आवाज... स्पष्ट अगदी.. आता मात्र मी जरा घाबरलो... इतक्या गारठ्यात पण घाम फुटायला लागला.. सरळ झपाझप घराकडे चालायला लागलो.. आवाज तस्साच माझ्या मागे.. अचानक माझ्या पायाला ताण जाणवला जसं काही तरी अडकलंय पायात.. आणि मी थांबलो.. अचानक माझा मुळ स्वभाव उफाळून आला.. मग मी ठरवल.. साला काय घाबरतोय मी? बघुयाच.. म्हणून थांबलो आणि खाली बघितल. तर लक्षात आलं, पायातल्या फ्लोट्रस च्या वेल्क्रो मध्ये एक मांजा अडकलाय आणि म्हणून माझ्या पायाला ताण जाणवत होता.. मी तो मांजा सोडवला आणि ओढला.. आणि परत तोच आवाज स्रर्र्र्रर्र्र्र.... स्रर्र्र्रर्र्र्र.. स्रर्र्र्रर्र्र्र..  मग माझ्या लक्ष्यात आलं, साला मांज्या च्या दुसर्या टोकाला एक फाटलेला पतंग होता.. आणि तोच जमिनी वर घासून तसला आवाज येत होता.. तो पतंग कुठ तरी अडकला म्हणून माझ्या पायाला ताण जाणवला.. आता माझ मलाच हसायला येतं होतं.. घरी जाऊन हा प्रकार सांगितला आणि सगळे कितीतरी वेळ हसत होतो.. आणि मग रात्री कितीतरी वेळ असले भूताबिताचे किस्से ऐकत बसलो..


मग मला वाटलं, सगळेच नाही, पण बरेचसे किस्से असेच तयार होत असतील...नाही?

Friday, January 12, 2018

रुतल्या ओळी, खोल जिव्हारी...

रुतल्या ओळी, खोल जिव्हारी,
कातर कातर पाऊस हा,
अन अश्यात ही ओल जिव्हारी...

ओले डोळे, शब्द ही ओले,
ओलेत्याने निथळत बसलो
आठवणींच्या नदीकिनारी...

तू होती अन मीही होतो,
आणि ओलं चांदणं होतं
निळी कातर गहराई...

#मोहा