Monday, August 5, 2019

माझा चेहेरा, माझे मुखवटे

दुनीये,मी विसरलो मी खरा दिसतो कसा.
तुझ्या चष्म्यातून पाहतो मी माझेच चेहरे...

दिसेना माझाच चेहेरा का मला आरश्यात?
चढवलेले सारे मुखवटे भासती आज खरे..

पाहतो अन शोधतो मी गाडलेल्या मला ईथे,
फास आवळाया लागले का तुझे हे पाहरे..

खोल असे गोंदले  प्राक्तनाला माझ्या कपाळी तू,
पण घे आज झुगारून चाललो मी तुझे सहारे...

#मोहा

Friday, August 2, 2019

तुम्हारी दौलत नई-नई है


"हॅलो, काय झालं गाडीला? काही मदत हवीय कां?" पावसाच्या सततच्या  पिरपिरीमुळे रस्त्याच्या झालेल्या नदीतून बाईक ढकलत जाणाऱ्या त्याला मी विचारलं. "हा, ते पेट्रोल सम्पलया जणू... पण काय नाय , नेतो कि ढकलत".. तो बोलला..

तोपर्यंत माझं त्याला न्याहाळून अन त्याच्याबद्दल मत बनवून झालं होतं. इतक्या पावसात ही त्याने घातलेले पांढरे कपडे, पांढरे जोडे आणि गळ्यात जरा कमी जाड पण माझ्या स्टॅंडर्ड ने जाडच सोन्याची चेन. अच्छा , म्हणजे साहेब मिनी गुंठा मंत्री आहेत तर...  चायला, कुठल्याही सिचूयेशन मध्ये आपण कुणाविषयी हि पटकन मत बनवून मोकळे का होतो? "बॉस, जजमेंटल होणं थांबवायाला पाहिजे हा तू" मी स्वतःलाच बजावलं..

"अरे शेठ, मी पेट्रोल पम्पाकडेच चाललोय. अन अजून २-३ किमी तरी दूर आहे इकडून. चला, मी tow करून नेतो तुम्हाला." त्याला बहुतेक तो प्रस्ताव पटला नाही किंवा आवडला नाही.. "आयला, 'मी' कुणा कडून मदत घ्यावी?" असा काहीतरी भाव १-२ क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावर आलेला मी टिपला. BC, हा "मी" पण, अहंम माणसाला कोडगा बनवतो..

२-३ सेकंद विचार केल्यावर तो तयार झाला. बहुतेक वाढत असलेला पाऊस, बाजूने जाणारी  वाहनं उडवत असलेलं पाणी अन कुठं तरी पोचायची घाई ह्या मुळे असेल कदाचित.  तो बाईक वर बसला आणि मी त्याच्या सायलेन्सर ला पायाने धक्का देत दोन्ही गाड्या चालायला लागल्या. ट्राफिक न्हवतं तितकं, म्हणून थोड्या वेळातच पेट्रोल पंपावर पोचलो.

एका इंटरव्ह्यूला जाताना पेट्रोल सम्पले असताना एका नागपुरी dude ने मला अशीच गाडी tow करून मदत केली होती, आणि माझ्या थँक्यू ला म्हंटलं होता "अब्बे, तू बी कुनालेतरी अशीच मदत करून देजो ना.. पसरत र्हायते अश्या गोष्टी मंग" अन खर्रा खाऊन पिवळे झालेले दात विचकत निघून गेला होता. तेव्हा पासून जेव्हा जमेल तेव्हा मी पण असं लोकांना पेट्रोल पम्पा वर सोडत असतो अधेमधे :)

तर, मिनी गुंठा मंत्री माझ्या पुढे उभे राहून पेट्रोल भरून घेत होते. माझा नम्बर आल्यावर मला म्हंटला, "ओ पाहुणं, माझ्या कडून xx रुपया चं पेट्रोल टाकून घ्या तुमच्या गाडीत, बरं का".. मी म्हंटल "शेठ, त्या साठी तुमची मदत नाही केली.. मला इक..." मधेच माझ्या वाक्य तोडत, मान जरा तिरकी करून, हाताचा पंजा स्टाईल मधे माझ्या चेहेर्या  समोर उभा नाचवत गुर्मीत बोलला, "मदत नको आपल्याला कुणाची, कळलं का? . घाई होती जरा म्हून आलो तुमच्या संग. पण मोबदला देणार आपण त्याचा.." अन पेट्रोल भरणाऱ्या पोराच्या हातात, माझ्या पेट्रोल साठी १०० ची नोट ठेवून, गाडीला किक मारून ठसक्यात निघून गेला..कुणा कडून मदत घ्यायला इतका कमीपणा का वाटत असावा? इतका माज? माणसं अशी का असतात BC.

असो, मी माझ्या पेट्रोल चे पूर्ण पैसे देऊन निघालो अन त्या पोराला १०० रुपये ठेवून घ्यायला सांगितलं.

#मोहा

मिलिंद शिंदे ह्या फेसबुक फ्रेंड , ज्यांना आम्ही मिशी दा म्हणतो, त्यांनी शबिना अदीम ह्या गझलकार महिलेचा शेर  कमेंट मधे टाकला तो फारच समर्पक आहे:

 जो खानदानी रईस हैं वो मिजाज रखते हैं नर्म अपना,
तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई-नई है।