Friday, June 12, 2020

जगाचे कायदे...

काल शिकवीत होतास, मज जगाचे कायदे
बनुनी वामन अता, मस्तकी बळीच्या पाय दे...

मांडून घे हिशोब सारे,चोपडीवर तू तुझ्या,
जातांना मोजून घेऊ, सारे तोटे अन फायदे...

क्षितिजांत अपुल्या अंतर, मी जाणून राखले,
राखलेल्या जाणिवेला, दुरूनच.. पण न्याय दे...

सदा तू ठेवून घेतो, जे हवे तुला ते माधवा,
सुदाम्याच्या पोह्याबदली, दुधावरची साय दे...

माझा गबाळेपणा, घेऊन आलो शहरी तुझ्या,
शिकव ढब रंगीली, अवतार हाय-फाय दे..

बाजारी फिरुनी मज, व्यवहार ना आले कधी
मुद्दल घेऊ कुणा कडून, व्याज म्हणून काय दे..

#मोहा

Thursday, June 4, 2020

मी काटयांचे फुल झालो

तुझ्या केसांत जावा माळल्या म्हणून बघ,
आणि मी काटयांचे फुल झालो, म्हणून बघ..

ओवून घे ना, माझ्या कळ्यांना, माळ गजरा,
ओवतांना कळी, तुझे श्वास तू मोजून बघ..

तू दिलेल्या फुलाचे, कोण जाणे काय झाले,
त्याचीच ही का झाली गझल? गाऊन बघ...

घेतला काढून तू, सुगंध तो अंतरीचा,
मग उरल्या पाकळ्या, त्याही जाळून बघ..

 निर्माल्य होत नाही, शेवटी साऱ्या फुलांचे,
 पुस्तकांत उरतात काही, वाहून बघ..

#मोहा

Friday, May 22, 2020

निरंतर...

तुझ्या उजेडाचे गोडवे गात जा तू,
मी माझ्या तमाला कुरवाळून घेतो...

बुडशील बघ आज रात्री तुझ्या तू,
माझ्या सकाळी मी हा झळाळून येतो...

कुणाला दाखवितो फुकाची मिजास?
का असा उगा उर बडवून घेतो?

तुला फासला तयांनी शेंदूर फार
तू ही स्वतःला देव ठरवून घेतो..

येण्या अन जाण्याचे चक्र निरंतर,
माझे-तुझे आरे 'तो' फिरवुन घेतो..

आटला परी आज हा झरा कोरडा,
पुन्हा श्रावणी तो खळाळून येतो..

#मोहा

Sunday, March 29, 2020

आयडेंटिटी क्राइसेस की ड्युअल पर्सनेलिटी??


काय शोधत बसलायस... सगळीकडे? स्वतःला?
कशाला शोधत बसलायस... सगळीकडे, स्वतःला..
तुझी आयडेंटिटी फेक आहे..
धुंडाळून धुंडाळून उभी करशील रास,
कागदी भेंडोळ्यांची आणि काही पुंगळ्यांची...
पण ते हवंय का तुला नक्की,
तुझी ओळख म्हणून, आयडेंटिटी म्हणून?
ती? कागदांवर छापलेल्या शाईतली?
त्या पर्सेनटेज च्या आकड्यातली?
अन वर्षागणिक वाढत गेलेल्या पगार
अन पदं मिरवणाऱ्या इन्क्रीमेंट्स लेटर्स ची?
तो आहे तू? तो?
मग, तो कोणाय तिकडे?
लेकीचा हिरो, बायकोचा मानबिंदू..
मायबापाचा आधार, भावाचा अन दोस्तांचा खांदा..
मला वाटलं तोच तू आहेस..
का तुला जडलाय नाद स्वतःला,
आयडेंटिटी क्राइसेस मधे ढकलण्याचा?
Well, तू नेहेमीच असा होतास,
ड्युअल पर्सनेलिटीचा.. नाही?
#मोहा

Sunday, February 23, 2020

तुझ्या सोबतीचे बहाणे किती

तुझ्या सोबतीचे बहाणे किती,
नसण्याचे तुझ्या गाऱ्हाणे किती...

तू येताच लगोलग जातेस का पण?
तुला चोरून मग पाहणे किती...

तूझ्या उंबऱ्यातुन तू पाहते मला,
पाहताना तिरके ते निशाणे किती...

भेटण्या येता खुणेच्या ठिकाणी,
अन लगबगीने तुझे मग जाणे किती...

कधी छेडिले ह्या वाऱ्याने लटांना,
तयांचे उधळणे जीवघेणे किती...

उतरतेस अलगद ओळींत माझ्या,
मग गझला किती , तराणे किती...

#मोहा

Wednesday, January 29, 2020

येताच तू...

येताच तू, मज, सुगंधी भास व्हावा,
जरासा अत्तराचा, हा श्वास व्हावा..

विसरून काळ जावा, भुलून वेळ जावी,
दिशांचा ही नको, मग अदमास यावा..

तू स्पर्शून जावे, मी मोहरून जावे,
एक स्पर्श चोरटा, बस हाच ध्यास व्हावा..

माझे तुझे हे, क्षितिज लोप व्हावे,
सोहळा मिलनाचा, असा खास व्हावा...

#मोहा

Saturday, January 25, 2020

तुझे ऊन...

तुझे ऊन माझ्या अंगणी उमलले कसे?
उगवतीलाच ना रे? पण ते कलले कसे?

तुझ्या सावलीला मज बसू दे जरा ना,
अरे, सोडून एकटे मला हे चालले कसे?

कवडसे इथे बघ छान उमटायचे ते,
ओंजळीत सारे ते तू उचलले कसे?

सावल्या माझ्या तुझ्या लांब गेल्या,
मनात आत थोडे काही, हलले कसे?

#मोहा