Thursday, December 23, 2021

ऊब

उबदार का नसावी,ह्या वर्षी शेकोटी ही?

तू गेलीस गेल्या थंडीत, घेऊन ऊब सारी...

Wednesday, December 1, 2021

भेटतो तिला...

तिला लिहितो, अन असाच तिला भेटतो, 
गजलेतून माझ्या नेहमीच तिला भेटतो..
 
ती होऊन पाऊस, भिजवीत रात जाते, 
अंगणात नाचणाऱ्या, थेंबांत तिला भेटतो
 
भेट म्हणता, म्हणाली थांब ना जरा, 
थांबतो आता अन, युगांनी तिला भेटतो
 

#मोहा

Friday, October 1, 2021

किंचित थबकून जातो, 

तू दिसली होतीस तेथे,

अस्पष्ट आठवण मग एक,

 खोल खोल मज नेते... 


आठवांना तुझ्या ह्या, 

काळ वेळ नसतो का?

विसरलो म्हणता म्हणता,

कशी काय कधी ही येते..


न बघता तू गेली,

उडवत उडवत पदराला...

माझ्याच सारखे ते किती,

जीव घायाळ झाले होते...


#मोहा

Friday, August 13, 2021

काळ बदलला..

 लहान होतो तेव्हां घराजवळ एक-दोन सायकलीची दुकानं होती, म्हणजे भाड्याने सायकली मिळायच्या तिथं. त्या काळात, जेव्हा आमच्या साठी कुठल्याही चैनी परवडण्या सारख्या न्हवत्याच, तेव्हा, १-२ रुपयात तासाभरासाठी भाड्याने सायकल आणून मनसोक्त हिंडणे, ह्यात लय सुख होतं. 


पुढं काळ बदलला.. आम्हाला स्वतःच्या सायकली मिळाल्या, मग लुना, मग बाईक मिळाली.. काळ पुढं जात राहिला.. आणि ती दुकानं मागे पडत गेली...


त्यातलं एक दुकान कधीच बंद झालं, तिथं लॉटरीचं दुकान उघडलं... आम्ही सायकली घ्यायला गर्दी करायचो तसं आता पोरं तिथं लॉटऱ्या घ्यायला गर्दी करतात...

अजून काही दुकानं पण होती... आता काळ बदललाय ना.. ती दुकानं पण बदललीत.. आता तिथं पंक्चर काढायची मळकट दुकान आहेत... आणि ते दुकानवाले काका पण नसतात तिथं.. त्यांचा पोरगा दिसतो.. बदललेल्या काळासोबत बदलत गेलेला.. टक्कल पडलेलं... उन्हात रापुन काळा पडलाय... असतो किडूकमिडूक पंक्चर काढत... 


त्याला आता सायकल दुसरी कडून भाड्याने आणावी लागत असेल का??


#मोहा 

Tuesday, June 29, 2021

थर्मस

 ३-४ वर्षाआधी प्लास्टिक बंदी झाली तेव्हा कोणी तरी एक eat out ग्रुप मधे पोस्ट टाकली होती, ज्यूस ऑर्डर केला म्हणे आणि पार्सल अल्युमिनियम फॉइल वाल्या कंटेनर (ज्यात राईस/बिर्याणी वगैरे देतात) मधे पॅक करून दिला म्हणून त्यावर कमेंट्स होत होत्या... प्लास्टिक बंदी...

मला आठवलं, आधी आम्ही थर्मस/थर्मास वापरायचो.. प्रत्येक घरी निदान एक दोन तरी थर्मस असायचे.. आमच्या घरी एक फुलांच्या डिजाईन चा निळा मोरपंखी रंगाचा होता.. मला त्याच्या आत बघायला खूप आवडायचं.. चकचकीत काचेला  पाऱ्याचा मुलामा दिला असायचा.. जणू आरशाचं गोल भेंडोळं करून भरलंय त्यात.. आणि त्याचं झाकण म्हणजेच कप.. आतला चहा, दूध ,ज्यूस जे असेल ते सरळ त्यात ओतायचं... बहुतेक वेळा दवाखान्यात ऍडमिट असलेली व्यक्तीच त्या झाकण वाल्या कपातून काय ते प्यायची.. मला फार अप्रूप असायचं आणि सिरियसली वाटायचं की मी ऍडमिट झालो कधी तर काय मजा येईल त्यातून ज्यूस प्यायला.... 

त्याकाळी बहुतेक नातेवाईक गावाकडे असायचे, आणि नागपूरात शासकीय दवाखान्यात (मेडिकल कॉलेज) ला उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती.. आणि आम्ही शहरात असल्यामुळं आणि बाकी जे होते ते काही करायला तयार नसल्यामुळे सगळी बडदास्त आमच्या कडेच असायची.... आई नौकरी सांभाळून ते सगळं न कंटाळता करायची.. ह्या वर पुन्हा कधीतरी लिहीन..

तर , त्यात तो थर्मस खूप वापरला गेला.. दवाखान्यातुन तो घरी आला की त्याचा एक खास ब्रश होता, आई त्याने हळुवार पणे धुवून, स्वच्छ पुसून उपडा करून ठेवत असे...  कितीतरी वर्ष तो वापरात होता...

मग काही आठवत नाही कुठं गेला.. नवीन येणारे मिल्टन चे फ्लास्क वगैरे येत गेले, मग तर प्लास्टिक ने त्याची जागा कधी घेतली ते जाणवलं पण नाही...

वाईट सवयी लवकर लागतात, नाही?

#मोहा 

Wednesday, June 23, 2021

तू गेल्यावर..

(तुझे डोळे खट्याळ भारी,
चालून जाते कट्यार भारी)

तू लिहिल्या कविता ज्यावर
त्या पत्राचा सुवास भारी,

आपल्यातले अंतर जितके
माझा तितका प्रवास भारी,

माझ्या गझलेच्या पानांवरचा,
कोरा सुटला, समास भारी

पाणी डोळा पाहूनही तू,
न लावलास तो कयास भारी

गेलीस अन मग न येण्याचे,
तुझे बहाणे झकास, भारी

तू गेल्यावर उरले जे का
मनात ओझे, मनास भारी

#मोहा