Monday, June 27, 2011

ध्याsssनाsssशूssरsss



आर्या प्ले-ग्रुप मधे असतानाची गोष्ट...
मी कॉम्पुटरवर काही तरी टंकत बसलेलो. आर्या बाजुलाच खेळत होती. मधेच स्क्रीन वर बघून विचित्र, बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारणं हा तिचा आवडता छंद... उगाच मधेच "मला एबीशिली (ABCD) लिहायची ना .." म्हणून की-बोर्ड बडवनं हा पण आवडता खेळ.

त्याच स्पेशल ट्रेनिंग तिच्या आई नि तिला दिल होतं. म्हणजे, पप्पा कॉम्पुटर वर काही काम करत असले, की ते फक्त गेमच खेळतात अशी ती शिकवण.. आणि म्हणून त्यांना डिस्टर्ब करायचं म्हणजे ते आपल्या सोबत खेळतील हा त्या मागचा हेतू..

असच थोडं माझ काम आणि थोडं तिचं असं चाललेलं.. इतक्यात ती माझ्या मांडीवर येऊन बसली. तिला काहीतरी आठवलं असाव बहुतेक.
एखाद्या युवराज्ञी ने सिंहासनावर बसून आज्ञा सोडावी त्या अविर्भावात म्हणाली "अहो, बंद कला तो कंपूतल" (आई ची हुबेहूब नक्कल करत)..
मी म्हंटल, "चिनू, मला थोडं काम आहे गं"..
"पप्पा, बंद कला ना.. आज शालेत काsssssय गम्मत झाली माहित्ये...." आणि माझ्या होकार-नकारला काडीचीही किंमत ना देता पुढे सांगती झाली..
"आज ध्यानाशूर आमच्या शालेत आलाssss "..
"ध्यानाशूर?? हा काय प्रकार??"
"ध्यानाशूर हो पप्पा".. "ये PSPO नही जानता" च्या अविर्भावात म्हणाली ..
आणि कार्टून सिरीज मध्ये एखादा भारी-भरकम राक्षस जसं चालतो तसं चालून, हाथ पुढे पसरवून जसं तो राक्षस कुणाला तरी पकडायच्या पवित्र्यात असतो, तसं माझ्या चेहऱ्यासमोर हातवारे करून दाखवले.. हे सगळ करता करता ती कधी कॉम्पुटर टेबल वर चढली, मला कळलंच नाहीं.

माझी ट्यूब एकदम पेटली, भारी शरीर यष्टी असणाऱ्या ज्ञानेश्वर नामक school van ड्रायवर आठवला.. तीच लिंक पकडून तिला बळेच खाली बसवत समजावलं, "चिनू, बाळा.. मोठ्या माणसांना असं बोलू नये.. Bad Manners", माझ्यातला संस्कारी बाप जागा झाला होता..
"मानुष?? नाही ना पप्पा.... मानुष नाहीं.. ध्यानाशूर.. आज तो जंगलातून आला.. असं चालत चालत (परत तसंच राक्षसा सारखं चालून दाखवत)"..
मी जास्त खोलात ना शिरता "बरं बरं.. मग?"
"तो शरल गेत मधून आला आणि आमच्या क्लाश मध्ये आलाssss .."
"ज्ञानेश्वर अंकल आले होते तुझ्या क्लास मध्ये??"

"नाही हो पप्पाsssss.. ध्यानाशूर आला होता.. असं असं चालत.."
तिला परत समजवण्याच्या सुरात म्हंटल, "चिनू, मोठ्या माणसांना असं म्हणायचं नाहीं ना बाळ.. काका किवा अंकल म्हणायचं"
माझ्याकडे फार लक्ष ना देता पुढे बोलत असताना तिच्या चेहेर्यावरचे भाव असे होते की ती एखाद्या लहान मुलाला राक्षसाची गोष्ट सांगत आहे ...
"ऐकाना पप्पा, तो असं असं चालत आला आणि टीचरला चावला.."

ड्रायवर टीचरला चावला??? मी जरा तो सीन imagine केलं आणि जोऱ्यात हसू आलं..

मात्र हसू दाबून मी तिला रागवत म्हंटले "चिनू, हे काय खोट-खोट सांगतेयस??
अंकल कसं चावणार टीचरला??"
"अहो पप्पा.. अंकल नाहीं ना, ध्योsssनोsssशोssर .." एखाद्या लहान बाळाला जशी भोंग्याची किंवा दाढीवाल्या बुवाची भीती दाखवताना मोठी माणसं आवाज काढतात तश्या आवाजातल्या "ध्योsssनोsssशोssर" वर भर देत म्हणाली..

"चिनू.. बस झालं.. काय चाललाय?? तो बिचारा ज्ञानेश्वर भूत आहे की राक्षस, जंगलातून येऊन तुझ्या टीचरला चावायला..?" मी जरा ओरडूनच म्हंटल..
ती बिचारी चेहेरा पाडून म्हणाली "काय हो पप्पा.... मी ध्यानाशूर ची गोष्त शांगतेय ना तुम्हाला.."
मी: "बरं, नक्की सांग काय झालं? अंकल नि काय केलं?"

"पप्पाss .. अंकल नाहीना.... ध्योनोशोsssssर...., तो असं असं चालत आला.. जंगलातून.. आणि टीचर ला चावलाssss .. "
आता मात्र मला कळतच नव्हतं की काय चाललंय आणि काय सांगतेय..

इतक्या वेळ शांत बसून आमचा "तमाशा" बघणाऱ्या सौ म्हणल्या.. "अहो.. तो (तिच्या सारख्याच आवाजात) ध्योनोशोsssssर, म्हणजे ज्ञानेश्वर अंकल नाहीये.. ती डायनासोर बद्दल बोलतीये.. आज कार्टून नेटवर्क वर बघितला तिनं.."

माझ्या डोक्यात पुन्हा दुसर्यांदा १००० व्हाट ची ट्यूब पेटून लक्ख प्रकाश पडला... ध्योनोशोर म्हणजे डायनासोर...

इतक्या सहज आमची हुर्यो करायचा चान्स सोडेल ती बायकोच कसली.."बाय द वे, आता पासूनच तुमच्या पावला वर पाऊल ठेऊन चालतेय.. काय होणार माझ्या पोरीचं देव जाणे.."

मनात म्हंटल, पोरी, बापाचा हाच फेकण्याचा गुण उचलायचा होतास??

2 comments:

  1. आयला! मी पण एवढा वेळ ज्ञानेश्‍वरच समजत होते. हसून पुरेवाट!

    ReplyDelete
  2. हो ना कांचन.. सौ ने खुलासा करेपर्यंत मला ही ज्ञानेश्‍वरच वाटत होतं..
    खर काय ते कळल्यावर पोट दुखत पर्यंत हसलो आम्ही..

    ब्लॉग वर स्वागत.. visit करत रहा..

    ReplyDelete