आठवतं का तुला, आपण कॉफी प्यायला जायचो ते?
आठवत असेलच म्हणा तुला... तू कुठे काही विसरायचीस कधी... सगळं बारीकसारीक डिटेल्स लक्षात रहायचं तुझ्या.. अगदी रंग, स्पर्श, सुगंध, चव आणि हो, प्रेम ही.. ह्या सारख्या intangible गोष्टींना ही तू quantify करून सगळ डिटेल्स लक्षात ठेवायचीस तू...
कधीकधी तर मला वाटायचं की तू एखादं वेळी म्हणशील "तू माझ्या वर आज एक किलो दोनशे ग्राम प्रेम केलंस.." 😁 जोक्स अपार्ट, पण मला तू नेमकी ह्या कारणांसाठी आवडायचीस.
आवडायचीस?? की आवडतेस? Well, आता त्याने फारसा फरक पडत नाही म्हणा.. तुला तरी नक्कीच नाही.. असो, विषयांतर झालं, नाही नका?
कधी तुला न विसरताही, आज तू आठवायचं कारण की, आज सारखाच त्या संध्याकाळी पण नुकताच पाऊस पडून गेला होता.. पाऊस रिता करून ढग अजूनही तिथेच थांबून राहिले होते.. काय बघायचं होतं त्यांना कुणास ठाऊक.. त्यांना तू त्यांच्यात उरलेला ओलेपणा मोजून आपल्यात शिरत जाणारा कोरडेपणा compare करत्येस की काय हे बघायचं असावं का रे?
आपण रस्त्यातले छोटे छोटे तळे चुकवत कॉफी प्यायला जात होतो... त्या छोट्या छोट्या तळ्यांत दिसणारं आकाशाचं, ढगांचं प्रतिबिंब बघत, वेगवेगळे आकार शोधत जात होतो आपण... तुला मी आकार दाखवायचो, कशी फुलपाखरू, हरीण, शार्क वगैरे.. तू मात्र त्यात भलतंच काही बघत असायचीस. तुला पॅटर्न कळायला वेळ लागायचा, मला मात्र ते पटकन कळायचे, दिसायचे.. म्हणूनच मला सगळ्यांच्या वागण्यातला पॅटर्न पण कळून कोण कुठे कसं जातंय, जाणाराय हे लगेच कळायचं.. आताशा मला त्या स्किल चा त्रास होतो.. माणसं जरा चटकन ओळखायला लागलोय मी..
त्या दिवशी मात्र, खरं तर हे सगळं, तो छोटासा ब्रेक जास्तीत जास्त लांबवायचाच प्रयत्न होता. तुला ही ते माहीत होतं आणि मलाही..सगळंच काही बिनसलं नव्हतं.. ओलावा जपून ठेवावा असं दोघांनाही वाटत असावं. जाणवायचं मला ते मधूनच...
त्याच रस्त्याच्या बाजूने, एका झाडाची एक फांदी भिंतीवरून बाहेर आलेली होती बघ.
त्या फांदीखालून तू जात होतीस आणि नेमकी मी ती जोरात हलवली.. त्यावर साठलेलं पाणी तुझ्या अंगावर पडलं आणि तू जरा भिजलीस... जणू तो पाऊस तिथं तुझ्याचसाठी साठवून ठेवला होता, अगदी प्लान करून जणू... मी हसलो आणि तू चिडलीस.. बळेबळेच मला तिथं उभं करून ती फांदी हलवलीस तू.. पण पाणी काही पडलं नाही.. मी अजूनच हसलो.. तू अजूनच चिडलीस.. म्हणालीस, हा पाऊस माझ्याकडे उधार राहिला...
आज इतक्या दिवसांनी तिथेच उभा होतो.. एकटा.. ती छोटी छोटी तळी पण होती तशीच.. ते पॅटर्न, आकार ही असावेत.. पण मला त्यात आज कुठलेच प्रतिबिंब बघायचे न्हवते, आकार शोधायचे न्हवते.. उपयोग ही नव्हता आणि वेळ दुनियाभऱ्याचा होता..
मी कॉफी घेऊन त्याच फांदी खाली उभा राहिलो, नकळत.
आणि वाऱ्याने तो आजचा साठलेला पाऊस माझ्यावर रिता केला.. क्षणभर वाटलं, तूच आलीस... पावसातली उधारी चुकती करायला.. आणि म्हणायला की बघ, १० ढगांतला पाऊस रिता केला मी तुझावर..
I wish, तू कधीतरी ती उधारी चुकवायला भेटशील पुन्हा, तिथेच त्या फांदी खाली.. मी वाट बघीन, कॉफी चा कप घेऊन..
मी वाट पावसाची पाहीन तुझ्यासाठी,
येशील रिता कराया, पाऊस साठलेला...
#मोहा
No comments:
Post a Comment