Wednesday, August 1, 2018

कॉफी चा कप आणि तो कोपरा..

पाऊस आला की मला फार विचित्र वाटतं.. काही तरी हरवल्या सारखं.. 
खूप हुरहूर जाणवते..
खरं तर सगळं काही ठीकच आहे... पण काही तरी होतं.. मग हे असं काही तरी सुचतं:


हा पाऊस बघितला ना खिडकीतून, तर कधी कधी वाटतं, मी तसंच रहावं...
खिडकीत राहून गेलेल्या कॉफी च्या कपा सारखं.. एका कोपऱ्यात.. निवांत.. तुझ्या असण्याचा सुगंध आणि तू गेल्यावर, काठावर उरलेला, सुकत चाललेला तवंग सांभाळत... एका कोपऱ्यात... निवांत...

त्या खिडकीतून पलीकडे दिसणारा चाफा हल्ली फुलत नाही बरं का आधी सारखा... भकास वाटतेय ती स्पेस आता... पण तरी.. मला आवडतो तो निवांत कोपरा...

इथून ना, ती बुकशेल्फ पण दिसतेय, आपण घेतलेली, आपण सजवलेली.. तुझ्या कवितांनी आणि माझ्या गझलांनी सजलेली... तशी तिथं मी जळमटं लागू दिली नाहीत कधी... पण हल्ली धुळीची पुटं वाढत चाललीये... आपल्यात वाढत जाणाऱ्या दुराव्या सारखी...

#मोहा

Wednesday, July 18, 2018

अनोळखी, पाहणे खूप झाले

ओळखीचे हसू ते, येऊ दे आता तरी,
नुसतेच अनोळखी, पाहणे खूप झाले....

तू व्यापले विश्व माझे, मी उरलो कुठे?
नसण्याचे कुठेही तरी, बहाणे खूप झाले.....

शहाणे अंतर असे ते, आहे तसेच राहो,
बावरल्या जवळीकेचे पण, तराणे खूप झाले....

#मोहा

Monday, July 2, 2018

शिंपून झाली अत्तरे...

आठवांची कुपी ही,
कोण सांडून गेले जातांना,
पावसापरी मग सारी,
शिंपून झाली अत्तरे...

प्रश्नांच्या राशी ह्या, 
कोण मांडून गेले जातांना,
माझ्या तुझ्या मौनातून, 
मग उलगडली ती उत्तरे..

विद्ध सूर अन ताण अशी तू,
छेडून गेली गातांना,
मी ही गात फिरतो आता,
यमक नसलेले अंतरे...

#मोहा

Monday, June 18, 2018

सुडोकू

जेव्हा पण मी सुडोकू सोडवायला घेतो, तुझी आठवण येते...
आठवतं, तूच शिकवलेले मला हे सोडवायला...?


Sunday, March 11, 2018

मी फक्त स्वप्नात रे, तुजला भेटलेलो,
वास्तवाशी माझा,कसला संबंध नाही...

भेटायचेच तुजला, कधीतरी नशिबा,
पण भेटण्याचा तुजला, कसला प्रबंध नाही...

ना पळतो उरी घेऊनी साऱ्या अपेक्षा,
कोण जिवन्त असा अन, कोण कबंध नाही?

जुळता जुळता सारे,विखरून सांडलेले,
विषाचे प्याले ही अन, येथे सबंध नाही..

#मोहा


*कबंध: शीर नसलेलं प्रेत

हिशोब तुझा न माझा...

टीप: ही गझल नाही. फॉर्म जरी गझले सारखा असला, तरीही ही कविताच आहे. कारण सुरेश भट "गझलेची बाराखडी" मधे म्हणतात: "गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो."

असो, तर, आज ही कविता:

तू ये ना कधी तुझ्या, साऱ्या राती घेऊनी,
मांडू हिशोब सारे, हात हाती घेऊनी...

तू मोजलेल्या तारका, मी सोसलेली वादळे,
आणि स्वप्ने रुजवलेली, ओली माती घेऊनी...

त्या पेटलेल्या मशाली, ठेवूनिया उशाशी,
उजेडाची स्वप्ने बघू, विझल्या वाती घेऊनी...

आज मांडायचेच सारे, माझे तुझे रकाने,
हिशोबी भावनांची, सारी खाती घेऊनी...

वा करूयात का ऐसे? मोडून हिशोब सारा,
भटकून येऊ युगांती, साथ साथी घेऊनी..


#मोहा

Friday, March 2, 2018

रंग मला दे कान्हा...

Image credit: http://bit.ly/2FLioY3


उधळून टाक सारे, रंग तुझे ते कान्हा,
श्याम तेव्हढा तो, रंग मला दे कान्हा...

मोरपिसापरी बघ त्या, रंगल्यात साऱ्या गोपिका,
मजला परी तुझ्यासम, कर सावळी रे कान्हा..

हरपले मी, हरवले मी, खोल अश्या त्या डोही,
रंग ज्याचा, श्यामसावळा, तुझ्यासारखा रे कान्हा...

सावळा तू, सावळी मी, सावळी ही बासरी,
भान सारे, तान सारी, निळीसावळी रे कान्हा..

#मोहा