Wednesday, December 25, 2019

हा शेर माझा नाही..

दुःख गझलेचे सांगतो, हा शेर माझा नाही
हे खेळ शब्दांचे सारे, हा शेर माझा नाही..

तुटल्या दिलाच्या कुण्या, गाजवतो मेहफिली,
रंगवत काफ़िये जातो, हा शेर माझा नाही..

शम्मा होऊन जळताना, कुठे हवेलीत कुण्या,
कितीक चुली पेटवतो, हा शेर माझा, नाही?

#मोहा

Monday, August 5, 2019

माझा चेहेरा, माझे मुखवटे

दुनीये,मी विसरलो मी खरा दिसतो कसा.
तुझ्या चष्म्यातून पाहतो मी माझेच चेहरे...

दिसेना माझाच चेहेरा का मला आरश्यात?
चढवलेले सारे मुखवटे भासती आज खरे..

पाहतो अन शोधतो मी गाडलेल्या मला ईथे,
फास आवळाया लागले का तुझे हे पाहरे..

खोल असे गोंदले  प्राक्तनाला माझ्या कपाळी तू,
पण घे आज झुगारून चाललो मी तुझे सहारे...

#मोहा

Friday, August 2, 2019

तुम्हारी दौलत नई-नई है


"हॅलो, काय झालं गाडीला? काही मदत हवीय कां?" पावसाच्या सततच्या  पिरपिरीमुळे रस्त्याच्या झालेल्या नदीतून बाईक ढकलत जाणाऱ्या त्याला मी विचारलं. "हा, ते पेट्रोल सम्पलया जणू... पण काय नाय , नेतो कि ढकलत".. तो बोलला..

तोपर्यंत माझं त्याला न्याहाळून अन त्याच्याबद्दल मत बनवून झालं होतं. इतक्या पावसात ही त्याने घातलेले पांढरे कपडे, पांढरे जोडे आणि गळ्यात जरा कमी जाड पण माझ्या स्टॅंडर्ड ने जाडच सोन्याची चेन. अच्छा , म्हणजे साहेब मिनी गुंठा मंत्री आहेत तर...  चायला, कुठल्याही सिचूयेशन मध्ये आपण कुणाविषयी हि पटकन मत बनवून मोकळे का होतो? "बॉस, जजमेंटल होणं थांबवायाला पाहिजे हा तू" मी स्वतःलाच बजावलं..

"अरे शेठ, मी पेट्रोल पम्पाकडेच चाललोय. अन अजून २-३ किमी तरी दूर आहे इकडून. चला, मी tow करून नेतो तुम्हाला." त्याला बहुतेक तो प्रस्ताव पटला नाही किंवा आवडला नाही.. "आयला, 'मी' कुणा कडून मदत घ्यावी?" असा काहीतरी भाव १-२ क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावर आलेला मी टिपला. BC, हा "मी" पण, अहंम माणसाला कोडगा बनवतो..

२-३ सेकंद विचार केल्यावर तो तयार झाला. बहुतेक वाढत असलेला पाऊस, बाजूने जाणारी  वाहनं उडवत असलेलं पाणी अन कुठं तरी पोचायची घाई ह्या मुळे असेल कदाचित.  तो बाईक वर बसला आणि मी त्याच्या सायलेन्सर ला पायाने धक्का देत दोन्ही गाड्या चालायला लागल्या. ट्राफिक न्हवतं तितकं, म्हणून थोड्या वेळातच पेट्रोल पंपावर पोचलो.

एका इंटरव्ह्यूला जाताना पेट्रोल सम्पले असताना एका नागपुरी dude ने मला अशीच गाडी tow करून मदत केली होती, आणि माझ्या थँक्यू ला म्हंटलं होता "अब्बे, तू बी कुनालेतरी अशीच मदत करून देजो ना.. पसरत र्हायते अश्या गोष्टी मंग" अन खर्रा खाऊन पिवळे झालेले दात विचकत निघून गेला होता. तेव्हा पासून जेव्हा जमेल तेव्हा मी पण असं लोकांना पेट्रोल पम्पा वर सोडत असतो अधेमधे :)

तर, मिनी गुंठा मंत्री माझ्या पुढे उभे राहून पेट्रोल भरून घेत होते. माझा नम्बर आल्यावर मला म्हंटला, "ओ पाहुणं, माझ्या कडून xx रुपया चं पेट्रोल टाकून घ्या तुमच्या गाडीत, बरं का".. मी म्हंटल "शेठ, त्या साठी तुमची मदत नाही केली.. मला इक..." मधेच माझ्या वाक्य तोडत, मान जरा तिरकी करून, हाताचा पंजा स्टाईल मधे माझ्या चेहेर्या  समोर उभा नाचवत गुर्मीत बोलला, "मदत नको आपल्याला कुणाची, कळलं का? . घाई होती जरा म्हून आलो तुमच्या संग. पण मोबदला देणार आपण त्याचा.." अन पेट्रोल भरणाऱ्या पोराच्या हातात, माझ्या पेट्रोल साठी १०० ची नोट ठेवून, गाडीला किक मारून ठसक्यात निघून गेला..कुणा कडून मदत घ्यायला इतका कमीपणा का वाटत असावा? इतका माज? माणसं अशी का असतात BC.

असो, मी माझ्या पेट्रोल चे पूर्ण पैसे देऊन निघालो अन त्या पोराला १०० रुपये ठेवून घ्यायला सांगितलं.

#मोहा

मिलिंद शिंदे ह्या फेसबुक फ्रेंड , ज्यांना आम्ही मिशी दा म्हणतो, त्यांनी शबिना अदीम ह्या गझलकार महिलेचा शेर  कमेंट मधे टाकला तो फारच समर्पक आहे:

 जो खानदानी रईस हैं वो मिजाज रखते हैं नर्म अपना,
तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई-नई है।

Friday, July 26, 2019

गॅलिलिओ च्या गुरुत्वाकर्षणाचा आमच्या घरातील प्रयोग..

गॅलिलिओ नं कधी काळी मांडलेला सिध्दांत, ज्यात तो म्हणतो की दोन असमान mass असलेल्या वस्तू उंचावरून निर्वात ठिकाणी सोडल्यास एकाच वेळी खाली पोचतील. मग म्हणे न्यूटनने पण ह्याला prove केलेलं. तर, आमची पोरगी लहानपणी, म्हणजे अगदी लहानपणी, हाच सिध्दांत सिद्ध करायचा वसा घेऊन आलेली..

आरु अगदी कुक्कुली होती तेव्हाची आणि आम्ही ठाण्याला रहायचो तेव्हाची गोष्ट. म्हणजे बघा, पाचव्या मजल्याच्या खिडकीतून काहीही खाली फेकलं की ते खाली बागेत पडतं आणि वरून पडे पर्यंतच दिसतं, इतकी समज आलेली होती पण काय फेकावं की फेकू नये हे काही अजून समजत न्हवतं. पडत असतांना टाळ्या पिटायच्या अन मग वाकून वाकून फेकलेलं जे काही आहे ते दिसतं का हे बघत रहायचं हा छंद...

तर, आता पर्यंत टीव्हीचा रिमोट, दुधाची बाटली, माझी पुस्तकं असं सगळं फेकून बघून झालं होतं. मोबाईल हे प्रकार हातापासून दूरच ठेवलेलं त्या मुळे वाचलेले होते. पण पुढे त्यावर दुसरे प्रयोग झालेत, त्याबद्दल पुढे कधीतरी लिहितो.

नमनाला घडाभर तेल झालंय खरं. तर त्या दिवशी काय दुर्बुद्धी सुचली हे काही आठवत नाही, पण आंघोळीला जातांना दोन आंगठ्या अन गळ्यातली चेन नेहेमीप्रमाणे काढून फळीवर ठेवता ठेवता काही तरी झालं अन मी खिडकीच्या बाजूला असलेल्या दिवाणाच्या पाळी वर ठेवलं... अन घात झाला... आंघोळ करता करता आठवलं आपण काय करून ठेवलंय ते. बायको ला आवाज देऊन बघितला पण ती किचन मधे असल्या मुळे काहीच उत्तर मिळालं नाही अन मग तस्साच अर्धवट साबण धुवून टॉवेलवर बाहेर आलो.. अन घात आलरेडी झालेला होता. तिथला ऐवज गायब होता अन मॅडम खाली वाकून बघत होत्या..

चेन पटकन सापडली.म्हणजे दिसली. कुठल्यातरी झाडाला अडकून तिसऱ्या मजल्यापाशी झुलत होती. चौकीदाराला दादापुता करून, काही चहापण्याला देऊन ती उतरवली गेली. एक अंगठी गटरच्या अगदी जवळ पडली होती. म्हणजे इतकी जवळ की उचलताना पण धक्का लागून फटीतून आत गेली असती.

दुसरी अंगठी सापडायला मात्र बायकोचे, सोसायटीच्या ४-५ रिकाम्या आज्या अन त्या प्रत्येकीचे एक-दीड तास सत्कारणी लागले. कशी ते कोण जाणे, पण क्राईम सिन पासून ती आंगठी १५-२० फूट दूर असलेल्या मातीत रुतून बसली होती. तोपर्यंत मी आपली उरलेली आंघोळ उरकून ९.१७ ची लोकल पकडून ऑफिसात निघून गेलो होतो. पण ती सापडल्याची बातमी येई पर्यंत रिकामी झालेली सीट पण पकडायचं लक्षात राहील नाही.. काहीही झालं तरी लग्नाची (सासरकडून मिळालेली अन हो, सोन्याची) आंगठी होती ब्वा...

मग तो धडा घेऊन आम्ही दिवाण खिडकीजवळून हलवला.. पण हाय रे कर्मा, तो पर्यंत बाईंना प्लास्टिक चा स्टूल ओढून खिडकीपर्यंत नेता यायला लागला होता, फक्त दिवाण तिथे होता म्हणून हा गुण अजून लक्षात आला नाही, इतकंच..

#मोहा

Sunday, May 5, 2019

सांझवेळी...

Image credit: https://media.artgallery.nsw.gov.au/collection_images/8/81.2010.a-j%23g%23S.jpg

तू होतेस हळवी, अशी का सांझवेळी,
रंगात मावळतीच्या, गुंतते सांझवेळी...

कातर किनारे, ओथंबल्या घनाचे,
पदरास तुझ्या, बिलगतात सांझवेळी...

रंगतो... बदलतो, असा नभाचा पसारा,
जसा बोलका तुझा, चेहरा सांझवेळी...

मी राखून ठेवतो, सारा चांद रातीचा,
तू निवडून वेचते, बस चांदण्या सांझवेळी,

ठरलेल्या संकेतांची, वाट मी पहावी,
तू विझवून दीप सारे, विझतेस सांझवेळी...

उद्या उगवतीस, उगवशील तू नव्याने,
पण रोज हाय का, तू मावळतेस सांझवेळी?

#मोहा

Saturday, April 13, 2019

माह्या अँटी-उत्क्रांतीवादाचा शोध...

थे मोठमोठ्या वैद्न्यानिक वगैरे शायन्या लोकायच्या शोधाले, त्यायच्या मांडलेल्या थेरीले (मराठीत थेअरी), सिद्धांताले (ह्याले मराठीत थेअरम म्हणतेत भौतेक), च्यालेंज कुठं द्या लागते , कुणाले मालूम हाय काय ब्वा?

आता त्या ब्लॅक होल च्या फोटो वरून लय सैंटिफिक पोस्टी टाकून ऱ्हायले लोकं. काही लोकायले तं ऑर्गजमचा फील येऊन ऱ्हायला जसा..
मंग म्या म्हनलं, मले बी तं त्या डार्विन ले च्यालेंज द्यायचं हाय..

म्या बी ठरवलं का डार्विन च्या उत्क्रांतीवाल्या थेरी ले च्यालेंज द्यालेच पाइजे... थे सगळं थोथांड हाय. प्रूफ हाय म्हाया जवळ त्याचं..

थो डार्विन म्हणते का जशी गरज असली तशेतशे शरीराचे भाग बदलत जाऊन पायजे तसं बनते.. म्हणजे कांगारूची शेपटी, जीराफाची मान वगैरे वगैरे... माणूस तं पुरा बंदराचा माणूस झाला, हा काही सवयी वान्नेरा (वानेर म्हणजे बंदर माकड वगैरे) वाणीच ऱ्हायल्या म्हणा, तेच्यावर नवीन पोस्ट टाकीन मंग कधीतरी...
आत्ताचा विषय असा हाय का, थ्या डारव्हीन बाप्पू नं सांगितल्यावाणी जर खरंच अशे बदल झाले असते,तं मंग माणसाच्या करांगळी वर, कापसाचा झुपका उगवला नसता का? ऑ?

आता असं पाह्यजा, आंघोळ करून आले रे आले, का तुम्ही का करता? कानात करंगळी टाकून खल्लंखल्लं हलवता.. कावून? कारण का तुमच्या कानात गेलं ऱ्हायते पाणी.. न तुम्हाले थे काढाचं ऱ्हायते बाहीर..

आता जर डारव्हीन ची थेरी खरी असती, तं माणसाची करंगळी थे ear bud सारखी नसती झाली का? कितीक हजार वर्षे, कितीक पिढ्या पासून माणूस असा करत आसन ब्वा?

अजून लय पुरावे हायेत माह्याकडं.. जसं, नाकात बोट घालूघालू खोदकाम करतेत माणसं, इतक्या अनादी काळा पासून, तं मंग थे बोट फावड्यासारखं कावून झालं नई?

पोरी-बायायच्या पोष्टीवर गुळ पाडू पाडू काई लोकायचे हात गुऱ्हाळावानी कावून झाले नई?

थे लो वेस्ट प्यांटी (प्यांट चे अनेकवचन, अश्लील अर्थ घेऊ नका कृप्या) घालू घालू पोट्ट्यायच्या कमरी (hips) फूट भर खाली कावून नई सरकल्या?

अजून लय लिस्ट वाढवता येईल मले.. पण बाकी आता त्या आफिसात जिथं ह्या थेरी ले च्यालेंज द्या लागते, थितीच बोलन म्या आता..

थो त्यावाल्या आफिस चा पत्ता तेवढा मेसेज करजा मले..

#मोहा


Tuesday, March 19, 2019

कसा ह्या क्षणांचा..

कसा ह्या क्षणांचा, क्षणात तास होतो,
अन साचून तास सारे, वैशाख मास होतो....

तू येतेस ना, उन्हाच्या पावलांनी,
उन्हाचा सावल्यांना, कधी त्रास होतो...?

बघू वाट मी, आता कुठवरी,
वर्षे किती सरल्याचा, उगा भास होतो...

ओलेत्या डोळ्यांचे, भिजरे किनारे,
भार आसवांचा, कुठे पावसास होतो...

तुझ्या गावचा वारा, भरुनी उरात घेता,
कधी प्राण आणि, कधी श्वास होतो...

#मोहा

Saturday, January 12, 2019

म्हणतो..

तुझ्या गझलांना कधीतरी चाल लावीण म्हणतो,
पावसावर लिहिलेल्या कविता कधीतरी गाईन म्हणतो...

तू लिहिलेल्या तुझा डायरीतल्या ओळींमधलं,
कधीही नं लिहिलेलं कधीतरी वाचीन म्हणतो...

ती मिर ची रुबाई अन तो गालिबचा शेर,
काफियावरच अडलेत अजून,
त्यांना ही जरा कधीतरी दाद देईन म्हणतो...

ते अरिजित चं गाणं, ती जगजीत ची गझल जुन्या रेकॉर्ड प्लेयर वर अडकून पडल्यात जणू,
त्यांचं ही म्हणणं कधीतरी ऐकेन म्हणतो...

आणि, माझं सिगारेट चं पाकीट, तुझा कॉफीचा कप..
टेबलावर कपाखाली, कॉफीचं अर्ध-पाऊण वर्तुळ, कधीतरी आवरीण म्हणतो...

अंगणातल्या कडुनिंबाच्या पानांतून  झिरपणारं चंद्राचं कवडसं, अन ती भिंतीवर थरथरणारी नक्षी बघत तू बसायचीस, भान हरपून, तसं मीही बसायचं म्हणतो...

हे सगळं सगळं करायचंय खरं तर.. कधीपासूनच.. पण, तुझ्या शिवाय हे सगळं करायचं कसं, ते कधीतरी शिकायचं म्हणतो...

#मोहा

Monday, January 7, 2019

मला हे आताशी, जरा भान आले

मला हे आताशी, जरा भान आले
लपवून आसवे, असे हसता छान आले...

मी निघालो दोस्तीचा, घेऊन पैगाम हा,
अन तुमच्यातून दोस्तहो, बंडाचे निशाण आले...

ओळखीच्या गावात ह्या, सारे कसे मुखवटे,
सारे ओळखीचे हे, चेहरे भयाण झाले...

उगारा तुमचे आसूड ते, चालवा ते सुरे,
माझ्या कवितेचे शस्त्र, कधीचे मयान झाले..

थांबवा विखार आता, अजून वेळ आहे,
जी बाग होती तिकडे, ते कधीच स्मशान झाले...

#मोहा