Sunday, January 28, 2018

अमावस्या आणि सरपटणारं काहीतरी

साधरण ४-५ वर्षाआधी ची गोष्ट.. रात्र तशी अम्वाश्येची.. पण दिवाळीची.. सगळी कडे झगमगाट, दिवे, लायटिंग.. सगळी कडे आनंद, उत्साह.. आम्ही पूजा आटपून बाहेर फटाके, आतिषबाजी सगळ आटपून जेवायला घरात येवून पण साधारण दोन तास होवून गेले होते. आईने केलेल्या नागपुरी पुरणपोळी, वडाभात, मसाल्याची वांगी इत्यादी जेवणावर ताव अंनि गप्पा मारत, तास भर जेवण चालू होते. साधारण १२-१२.३० पर्यंत यथासांग जेवणं आणि त्यानंतर आईने लावलेले पान चघळत वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि गंमत म्हणजे “फारशी भूक नाहीये मला” असं म्हणून पण गेला तास भर हादडत बसलो होतो.. आता ते सगळ जेवण गळ्याशी येत होतं म्हणून जरा शतपावली करावी म्हणून मी बाहेर पडलो. आमच्या नागपूर च्या घरासमोर मोठ्ठ मैदान आहे.. नागपूरला असलो, की रोज रात्री तिथे जरावेळ शत्पावली करायची सवय आहे.. तसच त्याही रात्री रस्ता ओलांडून मैदानात आलो आणि चालू लागलो.. आता सारखे तेव्हा तिथे हायमास्ट चे लाईट लागले न्हवते.. मी जरा माझ्या विचारांच्या तंद्र्तीच होतो.. थोड्याच वेळात जरासा गारठा जाणवताच माझ्या लक्षात आलं कि, आजुबाजू च्या घरातली रोषणाई आता कमी झालीये, दिवे कधीचेच विझून गेले होते.. नाही म्हणायला बऱ्यांच घरातले आकाश कंदील वार्यावर डुलत होते.. पण मैदानात मात्र एकंदरीत जरा अंधारच होता.. तो अंधार तसा सवयीचा असूनही मला जरा अचानकच एकटेपणाची आणि त्या अंधाराची जाणीव झाली.. बहुतेक मघाशी घरात जातानाचा उजेड आता नाहीसा झाल्याची ती जाणीव होती असं मनात येऊन गेलं. मी तसाच ह्या कोपर्यापासून त्या कोपर्यापर्यंत चालत गेलो. तिकडे असणार्या देवळातल्या गणपतीला आणि पिंडीला नमस्कार करून परत फिरलो आणि चालू लागलो..

थोडा वेळ चालल्यावर मला असं वाटलं कि माझ्या मागे कुणी तरी चालतंय.. म्हणजे अगदी अस्पष्ट असा आवाज आला.. मला वाटलं कुठलं कुत्रंबित्र असाव.. मी मागं वळून बघितल.. कुणीच न्हवतं.. “भास असावा बहुतेक?” मी माझच मला म्हणालो. मी सहसा लवकर घाबरत नाही. अगदी कुठल्याही वेळी कुठेही जातो. स्वभावत: जरा न घाबरणारा असल्यामूळे काहीही वाटलं नाही.. परत चालू लागलो.. दोन-चारच पावलं चाललो असेल.. परत तसाच आवाज.. आणि ह्यावेळेस जरा जास्त स्पष्ट.. मी थांबलो.. तर आवाज पण थांबला.. बरं, तो आवाज चालण्याचा,पावलांचा असावा म्हणाल तर तसाही न्हवता.. एखादा लुळापांगळा देह, पायात जीव नसलेला, हातांच्या जोरावर वाळलेल्या गवतावर जसा सरपटत जातो, तसला आवाज... स्रर्र्र्रर्र्र्र.... स्रर्र्र्रर्र्र्र.. स्रर्र्र्रर्र्र्र..  तिथलं गवत बर्या पैकी वाळलेलं होतं.. मी परत मागे फिरून बघितलं.. कुणीच नाही.. आणि आता अंधार जरा जास्तच गडद वाटत होता.. देवळातला दिवा तेव्हढा सुरु होता.. मी मागे बघतच उलटा होवून चालायला लागलो... परत तेच.. परत तोच सरपटण्याचा आवाज... स्पष्ट अगदी.. आता मात्र मी जरा घाबरलो... इतक्या गारठ्यात पण घाम फुटायला लागला.. सरळ झपाझप घराकडे चालायला लागलो.. आवाज तस्साच माझ्या मागे.. अचानक माझ्या पायाला ताण जाणवला जसं काही तरी अडकलंय पायात.. आणि मी थांबलो.. अचानक माझा मुळ स्वभाव उफाळून आला.. मग मी ठरवल.. साला काय घाबरतोय मी? बघुयाच.. म्हणून थांबलो आणि खाली बघितल. तर लक्षात आलं, पायातल्या फ्लोट्रस च्या वेल्क्रो मध्ये एक मांजा अडकलाय आणि म्हणून माझ्या पायाला ताण जाणवत होता.. मी तो मांजा सोडवला आणि ओढला.. आणि परत तोच आवाज स्रर्र्र्रर्र्र्र.... स्रर्र्र्रर्र्र्र.. स्रर्र्र्रर्र्र्र..  मग माझ्या लक्ष्यात आलं, साला मांज्या च्या दुसर्या टोकाला एक फाटलेला पतंग होता.. आणि तोच जमिनी वर घासून तसला आवाज येत होता.. तो पतंग कुठ तरी अडकला म्हणून माझ्या पायाला ताण जाणवला.. आता माझ मलाच हसायला येतं होतं.. घरी जाऊन हा प्रकार सांगितला आणि सगळे कितीतरी वेळ हसत होतो.. आणि मग रात्री कितीतरी वेळ असले भूताबिताचे किस्से ऐकत बसलो..


मग मला वाटलं, सगळेच नाही, पण बरेचसे किस्से असेच तयार होत असतील...नाही?

Friday, January 12, 2018

रुतल्या ओळी, खोल जिव्हारी...

रुतल्या ओळी, खोल जिव्हारी,
कातर कातर पाऊस हा,
अन अश्यात ही ओल जिव्हारी...

ओले डोळे, शब्द ही ओले,
ओलेत्याने निथळत बसलो
आठवणींच्या नदीकिनारी...

तू होती अन मीही होतो,
आणि ओलं चांदणं होतं
निळी कातर गहराई...

#मोहा