Sunday, November 13, 2016

बघशील का तू मागे?

तू गुंतूनी संसारात अशी,
मी असाच एकला काठावर ....
कधी बघशील का तू मागे?
वळणावरल्या बाकावर....

#मोहा

मी मांडत गेलो डाव

मी मांडत गेलो डाव,
ती उधळत गेली....
सावरून बटा स्वतःच्या,
मज फसवत गेली...
शब्द कधी हे फसवे,
अलगद पेरत गेली...
नजरेने करुनी पारध,
उगाच रिझवत गेली...
मी जिंकत जिंकत आलो,
अन ती हरवत गेली...
माज असा मग माझा,
ती चिरडत गेली...

#मोहा

Friday, August 26, 2016

प्रवासी


मी प्रवासी.. प्रवास संसार....
गुंतुनिया इथे, थांबू कसा?
खुणावती मज, अनंत पसारा...
मोह दिगांताचा, टाळू कसा?
#मोहा

Friday, August 19, 2016

तुझी आठवण अन उनाड पाऊस

तुझी आठवण ना, त्या उनाड पावसा सारखी झालीये...
कधी पण येते... कधी भुरभुर पावसा सारखी.. मनाला चिंब चिंब करणारी
तर कधी धो धो कोसळून माझं अस्तित्व पार हलवून सोडणारी...
खरंच, तुझी आठवण म्हणजे पाऊस झालीये..

#मोहा

रात काय, दिवस काय

रात काय, दिवस काय
फकिरास ह्या आता
गांजा काय तुळस काय..

रचतो ऋचा मनाच्या
गवळणी अन गाथा
यमक काय समास काय...

टाकून हा पसारा
जाऊ निघून कधीही
लोभ काय हव्यास काय...

#मोहा

ह्या पावसाने...

ह्या पावसाने कशास, माझ्यातुझ्यात यावे
श्वास तुझे अन माझे उसासे, पुरते भिजून जावे...

डोळ्यात पाहताना, हात हाती धरावा
डोहात डुंबताना, हलकेच श्वास घ्यावा...

#मोहा

Thursday, August 4, 2016

श्राप

तू दिलाच आहे, श्राप भाग्य भोगण्याचा,
आता कशा पुन्हा मी, दारी तुझ्याचं येऊ...

#मोहा

Monday, August 1, 2016

न्हवते कधीच

न्हवते कधीच मजला, असे अवचित भिजायचे,
आज पावसाने पण ही, कसली कमाल केली...
सांज निवताना, विसरण्या तुज निघालो,
ओल्या आठवणींनी अन,नुसती धमाल केली...
सोडूनि दूर आठवांना, मी निघालो एकला,
लगेच सोबतीला त्यांनी, दुःखे बहाल केली....
#मोहा

Sunday, July 31, 2016

शब्बा खैर...

चलो यारो, रुखसत ले लेते है,
इस रात की तन्हाई में,
थोड़ा तनहा हो लेते है,
कुछ ख्वाब रख छोड़े है,
उम्मीदों की देहलीज पर,
उन्हें देख आते है..
चलो, जरासा सो लेते है...

#मोहा

Saturday, July 23, 2016

किती उन्हाळे सोसले

घे टिपून ओठावरला पाऊस अलगद
तहानलेल्या ओठांनी, किती उन्हाळे सोसले..

व्यक्त हो ना, बोल जराशी
मुकेच घाव वागवताना, किती उसासे सोसले...

#मोहा

Sunday, July 17, 2016

मजूर अड्डा....


सकाळी आरूला ट्युशन ला सोडायला जाताना, अप्पर डेपो च्या पुढं असलेल्या मजूर ठेक्या वर ही म्हणून गर्दी... येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीकडे, माणसाकडे आशाळभूत नजरेनं पहात असलेली बाया अन माणसांची गर्दी... तिथून वाट काढत पुढं जाताच आरू नि विचारलं,
"पप्पा, हे लोकं का थाबलेयत इथं इतकी गर्दी करून?"
"अगं, ते काम मिळावं म्हणून वाट बघतायत."
"पण अस रस्त्यावर थांबून काम कसं मिळणार?"
"ज्यांना कामं करायला लोकं हवी असतात, ते इथे येतात आणि माणसं घेऊन जातात.... आपण नाही का घर शिफ्ट करताना इथून काही लोकांना नेलं होतं?"
"म्हणजे.... हा माणसांचा बाजार आहे का?"
"............"
"सांगा ना.."
"Not exactly... लोकं कामाच्या शोधात येतात इथं, इतकंच. कुणी माणसं विकत घेत नाहीत इथं."
"तुम्ही पण जॉब शोधताय ना? काल निशांत काकांसोबत बोलताना ऐकलं मी. मग तुम्ही पण असच कुठं जात का?"
आता मात्र मला त्या उभ्या असलेल्या मजुरांमधे मी दिसायला लागलो... रिझ्युम ची कॉपी हातात घेऊन येणाऱ्या प्रत्येक जॉब नोटिफिकेशन कडे आशाळभूत नजरे ने बघताना... आणि सगळे मजूर बहुतेक येणाऱ्याजाणाऱ्याकडे बघून असच काहीतरी बरळत होते...
I would like to take this opportunity to present my candidature for this position....

©अमित मोहोड

Wednesday, June 15, 2016

डायबेटीज आणि व्हॅटसऍपीय सल्ले...


ते: २८४?? अहो किती वाढली ती शुगर? आरू च्या सुट्ट्या तुम्हीच खूप एन्जॉय केल्या वाटतं.. ऑ?

मी: नाही, तसं...

ते: ते मरू दे.. बरं अस करा, १/२ किलो धणे, १०० ग्राम जिरे, १०० ग्राम तिळ, १५० ग्राम सुके खोबरे, ५ ग्राम काळी मिर (साधारण १०-१२ मिरे), ५ ग्राम लवंगा (साधारण १०-१२ लवंगा), ५ ग्राम दालचिनी (४ इंचाच्या २ काड्या), ५ ग्राम तमालपत्र (५ ते ६ पाने), १० ग्राम खडा हिंग, २ चमचे मिठ, १/४ कप तेल

हे सगळं मिक्स करा अन रोज सकाळ संध्याकाळ २ चमचे घेत चला.. १५ दिवसात आराम पडला नाही तर नाव सांगणार नाही बघा... तो डायबेटिस का फायबेटिस मुळापासून गायब होईल.. आहात कुठं?

मी: हो का? तुम्हाला कुठून कळला हा फार्मुला?

ते: फार्मुला कसला?? आयुर्वेदिक औषध आहे ते..

मी: अरे व्वा, आयुर्वेदाचा पण अभ्यास आहे म्हणायचा तुमचा..

ते: तर तर, 4 व्हाट्सअप चे ग्रुप आहेत आयुर्वेदाला समर्पित.. सगळं ज्ञान मिळतं तिथून.. तुम्ही कराच हे ट्राय.

मी: पण माझं आयुर्वेदिकच औषध सुरु आहे.. मित्र आहे माझा डॉक्तर, त्याच्या कडे.

ते: मग आम्ही चू** का? ट्राय तर करा.. आताच आलाय हा मेसेज... हा बघा..

मी: हो, पण तो ग्रुप "नॉनव्हेज रेसिपी" वाला दिसतोय... आणि चिकन मसाल्याचे ची रेसिपी आहे ती..😯😯

Sunday, April 17, 2016

ऑप्शन...





ती तिचा उंबरठा आणि तो त्याचं विश्व ओलांडून एकमेकांना भेटायला आलेले.. आणि आता वाडेश्वर कडून डेक्कन डेपो मागे नदीपात्राकडे चालतं जात होते.. एरव्ही जरा दुरून चालणारी ती, रस्ता ओलांडताना मात्र त्याचा हात अलगद धरत होती. रस्ता ओलांडून झाला कि परत तितकीच दूर... त्या अर्ध्या तासात त्या दोघांनी मोजून पाच वेळा रस्ते ओलांडले...
त्यांचं नातं काय हे तसं त्यांना हि सांगता येणार नाही.. बहुतेक दोघं पण त्या नात्या कडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असावेत. त्याच्या साठी ती, म्हणजे मैत्री पलीकडली.. बऱ्याच पलीकडली.. प्रेम? असेल हि कदाचित. त्याने बऱ्याचदा गमतीने हे बोलून हि दाखवले.. पण दोघांनीही व्यवहारिकरित्या, सोयीस्करपणे फारसं सिरीयसली घेतलं नाही. कारण तिला तिचा उंबरठा होता अडवायला आणि ह्याला ह्याच विश्व...
तिच्या साठी तो कोण होता कुणास ठाऊक.. अगदी त्यालाही न्हवतं कळत. पण बोलायला कुणी नसलं किंवा जे सांगायचंय ते कुणालाच सांगण्या सारखं नसलं की ती ह्याला सांगायची. हा म्हणायचा, मी तुझ्या साठी प्रयोरिटी कधीच कसा नसतो, नेहेमी एका ऑप्शन सारखा का असतो मी? ती म्हणायची, नाही रे.. माझा व्याप खूप आहे. सगळ्यांची मर्जी सांभाळता सांभाळता स्वतः साठी वेळचं मिळत नाही.. मग कधीतरी, म्हणजे आठवड्याभऱ्याने किंवा कधी पंधरा दिवसाने बोलणं होतं... (आणि पुढच्या बोलण्यापर्यंत तो वाट बघत रहायचा...)
पण आज त्याला अगदी स्पेशल असल्या सारखं वाटतं होतं. आज तो तिच्या साठी ऑप्शन न्हवता.. अगदी खास त्याच्या साठी तिने वेळ काढला होता..
रस्ता ओलांडताना तिने हात किती वेळा पकडला हे पण त्याने मोजले होते. तेवढ्यानेच तो सुखावून गेला होता... 
"थँक्स हा, छान वाटलं, तू रस्ता ओलांडताना माझा हात धरलास तेव्हा. गेल्या अर्ध्या तासात तू चक्क पाच वेळा हात धरलास माझा..  अगदी स्पेशल असल्या सारखं वाटलं मला..."
ती: "अरे तसं काही नाही. मला रास्ता ओलांडताना भीती वाटते, सो कुणीही सोबत असलं तरी मी हात पकडते. चल, मी निघते आता. ताईंचं काम झालं असेल. त्या वाट बघत असतील..."

Sunday, February 28, 2016

कश्या मागे, कोण जाणे..

कशा मागे कोण जाणे, सर्वच कसे,
पळत सुटले...

तोंडे वाकडी, वाकडी वाट,
वाकडे वाकडे
वळत सुटले..

ईर्ष्या, राग,  साठवत साठवत,
ओले सुके
जळत सुटले..

माझं माझं.. आंधळा मी....
स्वार्थांच हे पीठ सगळं,
दळत सुटले

कुठे कणव अन कुठे दया
विषवेली अन विषदंतच नुसते..
कालकुट मग
गळत सुटले

-अमित

Saturday, February 13, 2016

तेंच sorry अन hi...

च्यायला... हे बरं जमतं कुणाकुणाला...
येतेच मी लगेच.. बोलू नंतर...
म्हणायचं असलंच काही तरी..
अंन द्यायचा  मंतर..

आमचं काय... काम ना धंदा..
आयुष्यभर वाट बघत बसलो तरी,
ह्यांना कसला वांधा...

आता येईल.. मग येईल....
आता येईल.. मग येईल....
बघत बसा वाट..
दिवसाची रात्र होते..
रात्रीची पहाट...

मग वाटतं सालं जाऊ दे..
वाट पहायचं राहू दे..
आपण आपल काम करू,
तिला तिचं करू दे..

कामात गुंतायचा प्रयत्न  करता करता..
Excel मध्ये काळं-पांढरं भरता भरता..
मधेच एक विचार
मेंदूत वळवळतो...
हि बरी तर असेल ना??
मग माझा मीच कळवळतो...
पुंन्हा सुरु होतो मग
वाट बघण्याचा खेळ..
घडी कधी दाखवते १२,
कधी 1 ची वेळ ..

मग हिरमुसून आपणच
म्हणतो शेवटी गुडबाय..
उद्या असणारच आहे काहीतरी कारण..
तेच sorry अन hi...