आलास मित्रा..??
या वर्षी जरा उशिरा आलास.. आमच्या वेध-शाळेवाल्यांचा अंदाज कधी खरा ठरणार देव जाणे... नेहमी त्यांच्या पेक्षा आमच्या गावाकडला भटजी, नाहीं तर तो बाजारात दिसणारा नंदी तरी अचूक अंदाज सांगायचे..
मला वाटतं, या वेधशाळे वाल्यांचे चुकीचे अंदाज ऐकून-ऐकूनच कुणी तरी सरळ त्या भोलानाथला विचारलं असेल की "सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय"..
अरे हो, गावावरून आठवलं.. येताना माझ्या गावाला भिजवत आलास की नाहीं??? तिथला थोडा तरी सुगंध, ओलावा घेऊन यायचस की रे..
इकडे सगळं मिळतं पैसे मोजून.. पण तिथली आपुलकी आणि ओलावा नाहीं रे मिळतं.. गावाकडील माणुसकी, ओलावा आठवला आणि डोळे ओलावले नाहीत, असं कधीच झालं नाहीं..
तसं देवानं आमच्या गावावर जरा अन्यायच केलाय, नाहीं??
थोड्या तरी नद्या द्यायच्या की राव त्यानं आम्हाला.. म्हणजे तू आलास की त्यांमधून भर-भरून वाहिला असतास रे..
आमची पण शेतं जरा हिरवी झाली असती....
आमच्या पण ढवळ्या-पवळ्याना हिरवा चारा मिळाला असतां...
पोरा-सोरांना भातक मिळालं असतं.. आमच्या शेतकर्यांच जगणं जरा तरी सुसह्य झालं असतं.. चार पैसे खूळ-खूळले असते त्यांच्या हातात..
सावकाराच्या कचाट्यात सापडले नसते बिचारे...
जमीन-जुमला, जनावरं, प्रसंगी बायका गहाण नसत्या ठेवाव्या लागल्या रे..
सरकार कडून दरवर्षी जाहीर होणारे करोडो रुपयांची 'मदत' जी packages या गोंडस नावाखाली दिली जाते, आणि जे खरच त्या पैश्याचे हकदार आहेत, त्यांच्या पर्यंत कधीच पोचत नाहीत, ते तरी वाचले असते.. त्यांच्या पर्यंत पोहोचायच्या आधी, मधेच असणाऱ्या पांढर्या दलदलीत कुठे तरी गायब होऊन जातात ते पैसे.. आणि आमचा 'पांढर सोनं' पिकवणारा शेतकरी तसाच राहतो.. वर्षा-नु-वर्ष.. पैश्यासाठी हपापलेले लोक त्याच कापसाचे मस्त पैकी पांढरे, खादीचे खिसे शिवून भरून घेतात..
मित्रा, तू तर त्या देवाच्या जास्त जवळ राहतोस.. आभाळात... सांग नां जरा देवाला.. निदान या वर्षी तरी काही तरी कर म्हणावं.. नद्या नाहीं देता येणार आता तुला.. पण निदान आमच्या पांढर्या हत्त्यांच्या डोक्यात थोडी बुद्धी आणि हृदयात थोडी तरी कणव जागव म्हनं....
आरे, चार-दोन शेतकरी कमी मरतील रे एन्डोसल्फान पिऊन...
No comments:
Post a Comment