Saturday, November 14, 2015

Happy Children's Day....





मेहुण्याच्या लग्नाची शॉपिंग करून बाहेर पडलो.. कॅम्पातील M G Road वर दिवाळी जोरात होती.. अक्खा रस्ता दिव्यांच्या दिमाखदार रोषणाईने न्हाऊन निघाला होता... आरुसाठी घेतलेल्या फ्याशनेबल ड्रेस वर "Matching Long black  shoes" घेतले.. स्वारी मजेत होती.... 

"थंडी जाणवायला लागली आहे जरा, नाही?" समोरच्या दुकानातील काचेपलीकडे दिसणार्या किरमिजी रंगाच्या जॅकेटकडे बघत बायको बोलली. तिच्या बघण्याचा आणि  बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला..
 त्या काचेला नाक लाऊन, स्वप्नाळू, लकाकत्या डोळ्यांनी बघत छोटूकल्या ओठांचा चंबू बोलला, "जॅकेटला असणार्या कॅपचा फर कित्ती क्युट आहे ना पप्पा?".. 
"तुला हवंय का ते?" .. 
उत्तरादाखल फक्त एक गोड स्मित.. ह्या एका हास्यासाठी तर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. सगळी मेहनत, टेन्शन, सगळं काही  ह्या एका smile साठी तर झेलतो ना.. "चल... तुला चिल्ड्रेन्सडेच गिफ़्ट"... कळी खुलून लगेच टप्पोरा गुलाब. 

लग्नाच्या खरेदीत हा एक्स्ट्रा खर्च कसा बसवायचा  हा  प्रश्न  होताच. पण, ठीक आहे.. बघू काय ते.. तो माझा प्रश्न आहे... 

जॅकेटची फरवाली टोपी घालून माझी छकुली अगदी इग्लू मधे राहणाऱ्या एस्किमो मुली सारखी दिसत होती.. आणि मी कौतुकाने तिच्या कडे बघत तिची अखंड बडबड ऐकून घेत होतो.. दुकानातून बाहेर येताच "पप्पा, फुगा.. बलून...रेड वाला..."..
आणि ती पलीकडे उभ्या असलेल्या कार मागून डोकावणाऱ्या फुग्यांच्या गुछ्या कडे झेपावली देखील... मी तिच्या जवळ पोहोचे पर्यंत माझ्या लक्षात आलं की तिचा चेहरा पडलाय.. "काय ग? काय झालं?".. तिच्या पुढ्यात दोन चिमुरडी भावंड, साधारण तिच्याच वयाची, फुगे घेवून मोठ्या आशेने तिच्या कडे बघत होती..  "काय ग? रेड बलून नाहीये का त्यांच्या कडे?.... आहेत की ताई... घे तुला हवे तेवढे.."

त्यांच्या कडून दोन फुगे घेऊन आम्ही निघालो.. आता पर्यंत बडबड करणारी, नवीन जॅकेट, नवीन शूज, वर वर उडणारे बलून.. ह्या सगळ्या बद्द्ल बोलायचं सोडून, आरु मात्र गप्प होती.. शांत.. एक करुण भाव तिच्या समंजस चेहेर्यावर रेंगाळत होता..  तिला जवळ  घेऊन म्हणालो, "काय झालं मनु? आवडलं नाही का जॅकेट? तुझं children's day च गिफ़्ट आहे ना बाळा ते.."
"नाही पप्पा..म्हणजे जॅकेट छानच आहे..मला असंच हवं होतं.. पण.."
"पण? पण काय?"
पप्पा.. त्या बलूनवाल्या मुलांसाठी नसतो का हो children's day?? त्यांना कुणी गिफ्ट देतं का? त्यांना थंडी वाटली तर त्यांना जॅकेट देतं का कुणी? 

No comments:

Post a Comment