काल रात्री Ship of Theseus बघितला. बघून झाल्यावर नेहमीसारखा TV बंद केला आणि उठणार होतो, पण खिडकीतून बाहेर बघताना पावसाचा आवाज ऐकू आला आणि नकळत परत सोफ्यावर बसलो. बाहेर फार जोराचा पाऊस नव्हता; काचेवरून थेंब हळूहळू खाली येत होते आणि मध्येच एखादा दुसऱ्या थेंबात येऊन मिसळत होता. दोन वेगळे थेंब कुठल्या क्षणी एक झाले, आणि नवीन थेंबात नक्की अस्तित्व कुणाचं उरलं, हे कळत नव्हतं.
आणि तिथेच तो प्रश्न पुन्हा डोक्यात आला... हा मुव्ही बघतांना आलेला.
Theseus च्या जहाजाची एक फळी खराब झाली आणि जर ती बदलली . मग दुसरी , मग तिसरी. काही काळाने जहाजाचा एकही मूळ भाग शिल्लक राहिला नाही. तरीही ते Theseus चंच जहाज मानायचं का?
प्रश्न ऐकायला अगदी साधा आहे. पण गंमत अशी की, जहाजाचा विचार करताना काही वाटत नाही आणि तोच प्रश्न स्वतःबद्दल विचारला की थोडा विचित्र वाटतो.
दहा वर्षांपूर्वीचा मी आज समोर येऊन बसला तर त्याला मी ओळखेन का?
बहुतेक ओळखेन. चेहरा तर ओळखीचा वाटेलच. काही सवयी, काही बोलण्याची पद्धत, काही हट्टही कदाचित लगेच कळतील. पण त्याच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या तर कदाचित काही ठिकाणी मला त्याचं म्हणणं अजिबात पटणार नाही. आणि त्यालाही आजचा मी थोडा विचित्र वाटू शकतो.... कदाचित थोडा outdated देखील.
गमंत अशी आहे ना की, आपण बदललोय हे आपल्याला कधी जाणवतच नाही. रोज आरशात बघत असल्यामुळे चेहरा बदलत चाललाय हे कळत नाही. विचार बदलताना त्यांचा before-after फोटो नसतो. काही लोक आयुष्यातून निघून जातात, काही नव्याने येतात, काही गोष्टींचं महत्त्व कमी होतं आणि काही अगदी क्षुल्लक गोष्टी कधी इतक्या महत्त्वाच्या झाल्या हे आपल्यालाच कळत नाही.
म्हणूनच कदाचित एखादा जुना फोटो जास्त त्रास देतो. त्यातला माणूस आपणच असतो, पण त्याच्याकडे बघताना एक छोटासा प्रश्न पडतो, “हा मी होतो?” हे जे unrest आहे ना, हे ह्या मुव्ही मध्ये जास्तच च्या तसं दिसून येतं...
सिनेमातली पहिली गोष्ट एका photographer ची आहे. तिला दिसत नाही, पण ती photographs काढते. तिच्या कॅमेरा मध्ये जे टेक्निक दाखवलाय, ते इंटरेस्टिंग वाटलं. आता पर्यंत सॉफ्टवेअर्स प्रॉडक्ट बनवतांना ते accessibility compliant असलेच पाहिजे हे माहित होतं. पण कॅमेरा सारखे हार्डवेअर प्रॉडक्ट्स पण असे असू शकतात हे बघून मज्जा आली.
तिचं जग आपण जसं पाहतो तसं नाही, पण म्हणून तिचं पाहणं, म्हणजे दृष्टिकोन,कमी आहे, कुठं कमी पडतोय असं अजिबात वाटत नाही. उलट काही गोष्टी ती अशा पद्धतीने catch करते , ज्या आपण डोळे असूनही कदाचित बघणार नाही.
आणि एक दिवस, मग तिच्यावर surgery होते आणि तिला दृष्टी परत मिळते.
आपण इथे सहज आनंदी व्हायला हवं. एखाद्याला जे हवं होतं ते मिळालं, एवढंच ना? पण सिनेमा तिथेच थांबत नाही. दृष्टी मिळाल्यानंतर तिच्या photographs मध्ये काहीतरी बदलतं आणि ते मला जास्त interesting वाटलं.
आपण आयुष्यात अनेक गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत असतो. एखादं काम मिळालं की, एखाद्या शहरात गेलो की, एखादं नातं जुळलं की, एखादी अडचण संपली की सगळं ठीक होईल असं वाटत राहतं. पण एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपल्यातलं काहीतरी बदलतं आणि तो बदल नेहमीच चांगला किंवा वाईट असतो असंही नाही.
कधी कधी एखाद्या कमतरतेभोवतीच आपली नजर तयार झालेली असते. ती कमतरता निघून गेल्यावर जग तर बदलतंच, पण आपल्याला जगण्याची पद्धतही बदलते.
तुमच्या सोबत कधी असं झालंय का, की एखादी गोष्ट खूप दिवस हवी होती आणि ती मिळाल्यावर आनंद झाला, पण त्याच आनंदात कुठेतरी एक छोटासा अपरिचितपणाही जाणवला? “हे तर हवं होतं” असं म्हणत असतानाच “पण खरंच. हेच हवं होतं का आपल्याला?” असं वाटलं कधी?
मला वाटतं या सिनेमातला हा प्रश्न फक्त photographer चा नाही.
आपल्यालाही कदाचित अशाच अनेक गोष्टी बदलत राहतात आणि आपण त्यांच्यासोबत बदलत राहतो.
दुसरी कथा मैत्रेय ची.. हि गोष्ट बघताना मात्र मला वेगळाच प्रश्न पडला.
त्याच्यासाठी काही गोष्टी तडजोड करण्यासारख्या नाहीत. प्राण्यांवर प्रयोग करून तयार झालेलं औषध वापरायचं नाही, कारण स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाला किंमत मोजायला लावणं त्याला मान्य नाही.
हे सगळं ऐकताना त्याच्याशी सहमत होणं फार अवघड नाही. अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा त्याचं स्वतःचं आयुष्य त्या तत्त्वाच्या दुसऱ्या बाजूला उभं राहतं.
आपल्याला principles आवडतात. विशेषतः जेव्हा त्यांची किंमत आपल्याला मोजायची नसते. “मी असं कधीच करणार नाही,” हे वाक्य बोलणं सोपं आहे. “काहीही झालं तरी,” म्हणणं त्याहून सोपं. But life dosen't care about what you say. आयुष्याला आपल्या वाक्यांबद्दल फार आदर नसतो. ते कधीतरी आपल्यासमोर अशी परिस्थिती आणतं जिथे आपण कालच स्वतःबद्दल बोललेलं काही तरी आज अजिबातच १८० डिग्रीत फिरलेले असतं आणि स्वतःच्याच बोलण्याची ऑथेन्टिसिटी आज परत तपासून पाहावी कि काय असं वाटतं.
आणि मग प्रश्न असा राहत नाही की योग्य काय आणि अयोग्य काय. मग actually प्रश्न हा नसतोच की काय योग्य/अयोग्य आहे, प्रश्न असा होतो की, योग्य गोष्ट योग्य ठेवण्यासाठी मी स्वतः किती किंमत मोजायला तयार आहे? आणि माझ्यात ती धमक आहे का?
या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि मैत्रेय कडेही उत्तर नाही, म्हणूनच कदाचित त्याची गोष्ट खरी वाटते. आपण बाहेरून लोकांच्या निर्णयांकडे बघताना फार पटकन न्याय देतो. “मी असतो तर...” असं म्हणतो. आपण असतो तर खरंच काय केलं असतं? हे कुणालाच माहीत नसतं.
पुढली गोष्ट नवीन ची. ती आपल्याला आणखीच वेगळ्या ठिकाणी घेऊन जाते.
त्याचं kidney transplant चं ऑपेरेशन झालेलं आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यात एका अनोळखी माणसाचा एक अवयव येतो आणि त्याचं आयुष्य पुढे चालत राहतं. नंतर त्याला कळतं की त्या kidney मागे काहीतरी चुकीचं घडलं असावं आणि तो ते काय आहे हे शोधायच्या मागे लागतो.
मला या कथेतला प्रश्न kidney कोणाची आहे यापेक्षा थोडा वेगळा वाटला. आपण “माझं” म्हणतो ते नक्की किती माझं असतं? आपल्या शरीराचा विचार केला तरी प्रश्न विचित्र होतो. आपण जन्माला आलो तेव्हा शरीर काही ठराविक होतं आणि आज काही वेगळं आहे. त्यातलं किती माझं आहे आणि किती काळानुसार आलेलं आहे, याचा आपण कधी हिशोब ठेवत नाही. विचारांचंही तसंच आहे.
एखाद्या माणसाने कधीतरी सांगितलेलं वाक्य आपण वर्षानुवर्षे मनात घेऊन फिरतो. कुणाच्या प्रेमामुळे आपण स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतो. कुणाच्या जाण्यामुळे एखादी गोष्ट कायमची बदलते. कुणाच्या चुकीमुळे आपण स्वतःची एखादी चूक टाळतो.
मग माझ्यातलं “माझं” किती आणि बाकीच्यांचं किती? कदाचित याचं उत्तर शोधायची गरज नसावी. कारण आपण स्वतःला जसं समजतो, तसं आपण कधीच पूर्णपणे स्वतःचे नसतो. आपल्यात अनेक माणसं थोडी थोडी राहिलेली असतात. We are an accumulation of millions of souls, a little bit of everyone who touches our lives.
घरी बाबांचा एक जुना स्वेटर आहे. तो आता फारसा वापरात नाही. काही ठिकाणी धागे निघाले आहेत आणि कुठेतरी आईने पुन्हा शिवून ठेवलेला आहे. तो कधीचा आहे, किती वेळा शिवला गेला आहे, त्यातली मूळ लोकर किती उरली असेल, याचा काहीच अंदाज नाही. पण तो घेतला की बाबा आठवतात. हे मला नेहमी थोडं विचित्र वाटतं. कारण स्वेटर म्हणजे शेवटी स्वेटरच. त्यात बाबा नाहीत. हे आपल्याला माहित असतं. तरीही... काही वस्तूंना आपण त्यांच्या वस्तू असण्यापेक्षा काहीतरी वेगळं attach करून ठेवतो.
एखादा स्पेसिफिक वास, एखादी आठवण, एखाद्या माणसाची ऊब. आणि मग त्या वस्तूमधलं मूळ किती उरलंय हा प्रश्नच निरर्थक होतो.
कदाचित नात्यांचंही असंच असतं. कॉलेजमधला एखादा मित्र अनेक वर्षांनी भेटतो. गप्पा मारताना लक्षात येतं की आयुष्याने दोघांनाही वेगवेगळ्या दिशांना नेलं आहे. आवडी बदलल्या, विचार बदलले, कामं बदलली, काही जुन्या गोष्टींचं महत्त्व राहिलं नाही. पण मध्येच एखादा जुना सुंदर संदर्भ निघतो आणि दोघंही त्याच क्षणी परत त्या जुन्या काळात पोहोचतात.
एवढ्या वर्षांनंतरही एक joke तसाच funny वाटतो. एखादी जुनी भांडणाची गोष्ट आठवते. एखादा माणूस जो दोघांनाही आता भेटत नाही, त्याचं नाव निघतं.
एखाद गाणं, कधी काळी कँटीन च्या टेबल वर ठेका धरून गायलेलं आठवतं. आणि सोबतच बाजूच्या खुर्चीवरून वार्यावर अलगद उडणारी एक ओढणी आठवते. 😊
आणि अचानक जाणवतं की इतकं सगळं बदलूनही काहीतरी अजून तिथेच आहे.
काय आहे ते? माहित नाही. कदाचित आपण त्या माणसाला ज्या रूपात पहिल्यांदा ओळखलं होतं, ते रूप अजून आपल्या मनात कुठेतरी जिवंत आहे.
मग Theseus चं जहाज परत आठवतं. एकेक फळकुट बदलत गेलं तरी आपण त्याला तेच जहाज म्हणत राहिलो. आपल्याबाबतीतही कदाचित हेच होत असावं. शरीर बदलतं, विचार बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते. काही गोष्टी आपण स्वतः बदलतो आणि काही आपल्याकडून बदलवून घेतल्या जातात.
तरीही सकाळी उठल्यावर आपण स्वतःला त्याच नावाने हाक मारतो. काल ज्याला “मी” म्हटलं होतं, आजही त्यालाच “मी” म्हणतो.
कदाचित हीच आपली adjustment असेल. किंवा गरज. किंवा खरंच काहीतरी असतं जे या सगळ्या बदलांमधून टिकून राहतं. नेमकं काय, ते सांगता येत नाही.
जसा कालचा पाऊस... खिडकीवरचे थेंब खाली सरकत होते आणि मध्येच कुठलातरी थेंब दुसऱ्याला येऊन मिळत होता. काही वेळाने सगळे एकत्र झाले की सुरुवातीला कोण कुठला होता, हे सांगता येत नव्हतं.
कदाचित माणसांचंही असंच काहीतरी असेल. किती भाग जुना आहे, किती नवीन आहे, कोणाकडून काय आलंय, काय कुठे हरवलंय... हिशोब ठेवता येत नाही. फक्त कधीतरी एखाद्या जुन्या गाण्यात, एखाद्या जुन्या माणसाच्या आवाजात, किंवा कपाटातल्या त्या जुन्या स्वेटरमध्ये आपल्याला आपलाच एखादा जुना भाग सापडतो.
आणि मग जाणवतं, Ohh, that is still in me... somewhere deep inside.
बाकीचं जहाज कितीही बदललं असलं तरी.
#मोहा

काय जबरदस्त रसग्रहण आहे हे.. रसग्रहण पेक्षा या सिनेमानिमित्ताने घडलेलं चिंतन आहे जे जसं वाटलं तसं तू प्रत्यक्षात उतरवलं आहेस. हे वाचतांना खरोखर मलाही काही प्रश्न पडत गेले. मैत्रेयची गोष्ट स्वतःची वाटली. आणि शेवटी जी स्वेटरची गोष्ट आली... गलबलून आलं मला, डोळ्यांच्या कडा ओलावल्या. खूप छान 👌👌👌
ReplyDeleteहेत मूव्हीचं समीक्षण म्हणावं की आपल्याच जगण्याचं..!वाचत असताना कित्तीतरी वाक्यं रिलेट होत राहतात..आणि आपल्याच before आणि aftar प्रतिमांची उजळणी होते जणू.. वाचताना कातर झालं मन..
ReplyDeleteकाय सुंदर लिहिलं आहेस अमित. काय नि कसं कौतुक करू तुझं. किती वेळा वाचताना ' क्या बात!' असं उत्स्फूर्तपणे म्हणून गेले मी. मार्मिक आणि अचूक 💐💐💐💐
ReplyDeleteअफाट लिहिलं आहेस मोहा...
ReplyDelete