आलीस? जरा उशीरच झाला, नाही?
नाही, म्हणजे अजून ती शुक्राची चांदणी आहे वर…. पण उगवतीला आलेला विरहाचा रंग, तिची चमक जरा कमी करतोय…
आणि, माझ्यासोबतच वाट बघत बसलेला हा चन्द्र… अरे… कुठे गेला हा?
ह्म्म… थकला असेल बहुतेक… आणि गेला निघुन… त्याच्या चांदण्यांसोबत …
तो प्राजक्त उमलतोय बघ तिथे… तलम, केशरी रंगांच्या देठांचा… आणि शुभ्र, तुझ्या अंगाचा मादक सुगंध असणाऱ्या पाकळ्यांचा… आत्ता-आता पर्यंत, तो सुद्धा तुझी दरवळ कळ्यांमधे दडवून बसला होता वाट बघत… माझ्या सारखा…
अरे, हे काय?? आत्ता इथे छान धुकं दाटलेलं होतं बघ… तुझ्या पांढऱ्या, झिरमिरीत पदरासारखं… पण, आता तेही पहुड्लय, हिरव्या, लुसलुशीत गवताच्या पात्यांवर… दव बनुन…
ऐक ना, नको ना उठवूस मला…
साखर-झोप??? नाही गं वेडे, तुझी वाट बघतांना, युगं निघून गेलित… आणि उजाडता उजाडता, मी विझत गेलो… आत्ता-आत्ताच विझलोय … आत्ता-आत्ताच निजलोय… तुला जरा उशीरच झाला… जरा उशीरच झाला तुला…
जमलं तर एक कर, कुशीत घे मला… आणि तू पण पड जरा वेळ… पुढचं युग उगवेपर्यंत…
©
No comments:
Post a Comment