Sunday, July 17, 2016

मजूर अड्डा....


सकाळी आरूला ट्युशन ला सोडायला जाताना, अप्पर डेपो च्या पुढं असलेल्या मजूर ठेक्या वर ही म्हणून गर्दी... येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीकडे, माणसाकडे आशाळभूत नजरेनं पहात असलेली बाया अन माणसांची गर्दी... तिथून वाट काढत पुढं जाताच आरू नि विचारलं,
"पप्पा, हे लोकं का थाबलेयत इथं इतकी गर्दी करून?"
"अगं, ते काम मिळावं म्हणून वाट बघतायत."
"पण अस रस्त्यावर थांबून काम कसं मिळणार?"
"ज्यांना कामं करायला लोकं हवी असतात, ते इथे येतात आणि माणसं घेऊन जातात.... आपण नाही का घर शिफ्ट करताना इथून काही लोकांना नेलं होतं?"
"म्हणजे.... हा माणसांचा बाजार आहे का?"
"............"
"सांगा ना.."
"Not exactly... लोकं कामाच्या शोधात येतात इथं, इतकंच. कुणी माणसं विकत घेत नाहीत इथं."
"तुम्ही पण जॉब शोधताय ना? काल निशांत काकांसोबत बोलताना ऐकलं मी. मग तुम्ही पण असच कुठं जात का?"
आता मात्र मला त्या उभ्या असलेल्या मजुरांमधे मी दिसायला लागलो... रिझ्युम ची कॉपी हातात घेऊन येणाऱ्या प्रत्येक जॉब नोटिफिकेशन कडे आशाळभूत नजरे ने बघताना... आणि सगळे मजूर बहुतेक येणाऱ्याजाणाऱ्याकडे बघून असच काहीतरी बरळत होते...
I would like to take this opportunity to present my candidature for this position....

©अमित मोहोड

No comments:

Post a Comment