तू नसताना मी थांबणार नाहीच.. चालत राहीन.. काळ पुढे जातो तसा... पण पोचणार मात्र कुठेच नाही...
तू नसताना कुठे पोहोचायची ना घाई ना उत्सुकता ना उत्कंठा... गरज ही नाही खरं तर... पण लोकलाजेसत्व अन राहटगाडग्याची सवय म्हणून चालत राहीन.. तू गेलीस आणि मी संपलो, थांबलो असं कुणी म्हणून तुला उगाच बोल लावू नये म्हणून.... मी चालत राहीन एकटा, तू परत येत पर्यंत.. प्रारब्धाच्या वाटेवर.. मागे वळून बघत राहीनंच... कुठल्या तरी वळणावर तू येशील परत कदाचित... पण, तुला आपली नेहेमीची वाट आठवेल ना? की नव्या वाटा, नवे प्रवासी असं होईल तुझं?
हरकत नाही माझी काही त्याला पण.. तो तुझा प्रवास आहे.. कुणासोबत कुठल्या वाटेवर जायचं हे तुझं तूच ठरवशील... फक्त आपला प्रवास, आपण हुडकून, शोधून काढलेली वाट आठवणीत ठेव.. तू म्हंटली होतीस, आपण कुठे पोहोचू माहित नाही.. पण हा प्रवास, हि वाट सुंदर आहे.. तुझ्याच सारखं मला पण वाटायचं कि ती कधी संपूच नये...
असो, मी वाट बघिनच आणि तू येशीलच... पण नव्या प्रवासाच्या आणि प्रवाश्याच्या आठवणीत मी असणार ना?
#मोहा
No comments:
Post a Comment