Wednesday, December 13, 2017

हस्ताक्षर...


नागपूर... साल साधारण 2000/2001 असावं. गणपती चे दिवस होते... सगळी कडे गणेशोत्सवाची धूम होती.. आमच्या एक मित्राच्या कॉलनीत, त्याने आणि त्याच्या ग्रुप ने गणपती बसवला होता.. सगळे कॉन्व्हेंटात जाणारे..त्या दिवशी काहीबाही स्पर्धा होत्या.. अन आम्ही काही रिकामचोट (नागपुरातला रिकामटेकड्या लोकांसाठी वापरण्यात येणारे खास शब्द) दोस्त लोकं टवाळक्या करायला अन हिरवळ बघायला म्हणून त्या कॉलनीत गेलो संध्याकाळचं..
बऱ्यापैकी कार्यक्रम चालू होते.. धावणी, सायकल रेस, स्लो सायकल वगैरे.. आमचाही चिमण्यापाखरं बघायचा कार्यक्रम बरा चालू होता..
ह्या सगळ्यांत एक unusual गोष्ट मी नोटीस करत होतो.. बरेच पोरं, पोरी, वगैरे कागदाच्या छोट्या छोट्या चिटोऱ्या, चिठ्ठ्या आयोजकांजवळ आणून देत होते.. मला वाटलं काही गाण्यांचा कार्यक्रम असावा आणि म्हणून हे लोकं फर्माईशी आणून देत असावेत...
मी कुतूहल म्हणून मित्राला विचारलं, "कायच्या चिठ्ठ्या जमा करुन रहायले बे?" तो म्हणाला, "अरे, आमच्या कडे हस्ताक्षर स्पर्धा आहे आज"..
मी विचार केला च्यायला, ह्या चिटोऱ्यांवर लिहून आणलेल्या वरून कसं हस्ताक्षर जज करणार हे लोकं?
माझं स्वतः च अक्षर इतकं खराब होतं, की मी असल्या कुठल्याच स्पर्धेत कधी भाग घेतला न्हवता.. माझं अक्षर डॉकटर होण्यासाठी अगदी फिट आहे असा माझा पक्का समज होता, जो कालांतराने फोल ठरला, अन "ज्यांची अक्षरं खराब आहेत ते आणि तेच डॉकटर्स होतात" हा समज पण...
मग कालांतराने ह्या हस्ताक्षरांच्या साक्षात्काराने कॉम्प्युटर फिल्ड निवडण्या मागे,  टाइपिंग करून लिहिण्यापासून सुटका होईल हा उद्देश..
त्या फिल्ड मधे पण कितीतरी दिवस , टाईप करत असतांना मी स्क्रीन वर अक्षरं कशी येतायत हे बघुन घ्यायचो.. आमचे एक कम्प्युटर चे मास्तर म्हणायचे, "आबे, तो टाईप करत असतांना त्याले धक्का देऊ नका बे, अक्षर बिगडन त्याचे"...
असो , जरा जुनं दुखणं वर आल्यामुळे विषयांतर झालं..
तर, मुद्दा जा होता, की एवढ्याश्या बोट-दोन बोटा च्या चिठ्ठीवरून हस्ताक्षर कस जज करणार? ही दाट षणका आल्यामुळे मी त्या आलेल्या चिठ्ठ्यांपैकी काही उघडून बघितल्या..
त्यात लोकांनी चक्क सह्य करून आणल्या होत्या.. मी कपाळावर इतक्या जोऱ्यात हात मारला, की कपाळ लाल झालं (कपाळमोक्ष झाला नाही, नशिब)...
मी त्याला विचारलं, बाबा रे, काय आहे हे?
तो: का रे? मराठीत हस्ताक्षर म्हणजे signature ना??
मी काहीही न बोलता तिथून गप निघालो...
ही अगदी सत्यघटना आहे.. बाजूच्या गणपती मंडळात होणाऱ्या हस्ताक्षर स्पर्धा बघून, त्या कॉन्व्हेंटि ग्रुप मधे कोण तरी डिक्शनरी मध्ये हस्ताक्षराचा अर्थ बघून ती स्पर्धा आयोजित केली होती...


#मोहा

2 comments:

  1. Replies
    1. धन्यवाद ना बावा... येत र्हायजो ब्लॉग वर अशीच मधी मधी

      Delete