३-४ वर्षाआधी प्लास्टिक बंदी झाली तेव्हा कोणी तरी एक eat out ग्रुप मधे पोस्ट टाकली होती, ज्यूस ऑर्डर केला म्हणे आणि पार्सल अल्युमिनियम फॉइल वाल्या कंटेनर (ज्यात राईस/बिर्याणी वगैरे देतात) मधे पॅक करून दिला म्हणून त्यावर कमेंट्स होत होत्या... प्लास्टिक बंदी...
मला आठवलं, आधी आम्ही थर्मस/थर्मास वापरायचो.. प्रत्येक घरी निदान एक दोन तरी थर्मस असायचे.. आमच्या घरी एक फुलांच्या डिजाईन चा निळा मोरपंखी रंगाचा होता.. मला त्याच्या आत बघायला खूप आवडायचं.. चकचकीत काचेला पाऱ्याचा मुलामा दिला असायचा.. जणू आरशाचं गोल भेंडोळं करून भरलंय त्यात.. आणि त्याचं झाकण म्हणजेच कप.. आतला चहा, दूध ,ज्यूस जे असेल ते सरळ त्यात ओतायचं... बहुतेक वेळा दवाखान्यात ऍडमिट असलेली व्यक्तीच त्या झाकण वाल्या कपातून काय ते प्यायची.. मला फार अप्रूप असायचं आणि सिरियसली वाटायचं की मी ऍडमिट झालो कधी तर काय मजा येईल त्यातून ज्यूस प्यायला....
त्याकाळी बहुतेक नातेवाईक गावाकडे असायचे, आणि नागपूरात शासकीय दवाखान्यात (मेडिकल कॉलेज) ला उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती.. आणि आम्ही शहरात असल्यामुळं आणि बाकी जे होते ते काही करायला तयार नसल्यामुळे सगळी बडदास्त आमच्या कडेच असायची.... आई नौकरी सांभाळून ते सगळं न कंटाळता करायची.. ह्या वर पुन्हा कधीतरी लिहीन..
तर , त्यात तो थर्मस खूप वापरला गेला.. दवाखान्यातुन तो घरी आला की त्याचा एक खास ब्रश होता, आई त्याने हळुवार पणे धुवून, स्वच्छ पुसून उपडा करून ठेवत असे... कितीतरी वर्ष तो वापरात होता...
मग काही आठवत नाही कुठं गेला.. नवीन येणारे मिल्टन चे फ्लास्क वगैरे येत गेले, मग तर प्लास्टिक ने त्याची जागा कधी घेतली ते जाणवलं पण नाही...
वाईट सवयी लवकर लागतात, नाही?
#मोहा
जुन्या आठवणी
ReplyDelete